निमंत्रक म्हणून मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची केली निवड…
अमळनेर:- फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या पदाधिकारीशी चर्चा केल्यानन्तर मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी व कार्यकारी मंडळाने ही निवड केली आहे.
त्याचप्रमाणे संमेलनाचे निमंत्रक म्हणून मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांची तर प्रमुख संरक्षक व सल्लागार म्हणून जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वछता मंत्री गुलाबराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबाबतची माहिती साहित्य मंडळाचे समन्वयक डॉ नरेंद्र पाठक यांना कळवण्यात आली आहे. संमेलनाच्या इतर पदाधिकारी आणि विविध समित्यांची निवड आठवडाभरात करण्यात येऊन त्यांच्यावर जबाबदारी देखील सोपवण्यात येणार असल्याची माहिती म. वा. मंडळाने दिली. ९७ व्या साहित्य संमेलनाच्या प्रमुख पदांवर जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांची निवड झाल्याने संमेलन यशस्वी करण्यासाठी गती मिळणार आहे. नुकतीच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रताप महाविद्यालयात आढावा बैठक घेऊन समित्या, सुख सुविधा, सुशोभीकरण आदींसाठी लागणाऱ्या गरजा बाबतीत चर्चा केली होती. त्यानुसार संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे.