अमळनेर:- मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी अमळनेर येथे अन्नत्याग करणाऱ्या चौघांचे सायंकाळी उपोषण सोडण्यात आले.
गेल्या तीन दिवसांपासून अमळनेर तहसील कार्यालयाबाहेर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात येत होते यात चौघांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. त्यापैकी सचिन वाघ, जयंत पाटील, प्रवीण देशमुख यांची प्रकृती खालावली. चक्कर येणे, साखर कमी होणे, स्नायू दुखणे,डोके दुखणे,अशक्तपणा जाणवणे आदी त्रास व्हायला लागला होता. उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी वैद्यकीय पथकाला आंदोलनकर्त्यांची तपासणी करायला पाठवले. डॉ प्रकाश ताळे व त्यांच्या पथकाने चारही जणांची तपासणी करून विविध चाचण्या घेतल्या. तिघांनाही डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता. हर्षल जाधव यांची प्रकृती देखील नाजूक झाली होती. मनोज जरांगे यांनी सरकारला दोन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर काल रात्री उशिरा हे उपोषण सोडण्यात आले. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक विजय शिंदे, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार डॉ बी एस पाटील यांच्या हस्ते सरबत देवून अन्नत्याग आंदोलन सोडवण्यात आले.