जानवे ग्रामस्थांनी फलक लावत जिल्हाधिकारी व पोलिसांना निवेदनाद्वारे इशारा…
अमळनेर:- शासनाने दुष्काळी तालुक्याची यादी जाहीर केली असून त्यात अमळनेर तालुक्याचे नाव नसल्याने तालुक्यातील जानवे येथील शेतकऱ्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावबंदी करत असल्याचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
अमळनेर तालुक्यात सुरुवातीला सलग ४२ दिवस पाऊस पडलेला नाही, पाण्याअभावी पिके करपली. शेतकऱ्यांना उत्पन्न आलेले नाही. कापूस, मका, ज्वारी, उडीद, मुग पिकांचे नुकसान झाले मात्र पीक विमा मिळाला नाही. तरीही शासनाने जाहीर केलेल्या यादीत अमळनेर तालुक्याचे नाव दुष्काळी तालुका म्हणून नसल्याने या तालुक्याला रोजगाराची कामे, पीकविमा, शासकीय अनुदान मिळणार नाही, म्हणून जानवे येथील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत जोपर्यंत अमळनेर तालुक्याचे नाव दुष्काळी यादीत येत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला गावात येण्यास बंदी करण्यात येत आहे. कोणी प्रवेश केला तर अपमान करण्यात येईल असा इशारा देणारे निवेदन जिल्हाधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर कल्पेश पाटील, शिवाजी पाटील, अशोक बोरसे, समाधान पाटील, शरद पाटील, ललिता पाटील, सरलाबाई पाटील, विजय पाटील, मधुकर पाटील दगडू पाटील, ईश्वर पाटील, भुपेश पाटील, प्रकाश पाटील, किशोर पाटील, धर्मा पाटील, संतोष पाटील, विनोद पाटील, हिरालाल पाटील, अमृत पाटील, सुरेश पाटील, दगडू पाटील, रवींद्र कापडणीस,रमेश गोबा, संतोष न्हावी, धर्मा पाटील, गोपीचंद पाटील,लोटन मोरे यांच्यासह १०८ शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.