
सरासरीच्या फक्त ७१ टक्के पाऊस झाल्याने तालुक्याला न्याय द्या:- मा.आ. साहेबराव पाटील
अमळनेर:- तालुक्यात फक्त ७१ टक्के पाऊस झाल्याने मंत्री अनिल पाटील यांनी आगामी ऑक्टोबर २०२३ ते जून २०२४ दरम्यानचा १०७ गावांचा टंचाई आराखडा मंजूर केला आहे.

पावसाळा अनियमित झाल्याने अनेक गावांना पाणी टंचाई जाणवू शकते. ऑक्टोबर पासून ते पुढील वर्षाच्या जून महिन्यापर्यंत टंचाईच्या झळा जाणवू शकतात म्हणून मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला अमळनेर तालुक्याचा संभाव्य टंचाई आराखडा तयार करून खर्चाची तरतूद करून ठेवा असे निर्देश दिले होते. त्यानुसार ग्रामीण पाणीपूरवठा विभागाने विविध नऊ उपाययोजनांची तरतूद करून १०७ गावांचा आराखडा तयार केला आहे. विहीर खोलीकरणसाठी ८ गावांना १४ लाख रुपये, खाजगी विहीर अधिग्रहण करण्यासाठीं ५९ गावांना १५ लाख, ट्रॅक्टर व बैलगाडीने पाणीपुरवठा करण्यासाठी ८ गावांना १४ लाख रुपये, नवीन विंधनविहिरी व कूपनलिकासाठी १९ गावांना १९ लाख, पूर्ण केलेल्या नळ योजना दुरुस्ती करण्यासाठी १२ गावांसाठी ३१ लाख रुपये खर्च, तात्पुरती नळपाणीपुरवठा साठी १ गावाची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी दोन लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
प्रतिक्रिया…
अमळनेर तालुक्यात सतत ४२ दिवस पावसाचा खंड पडला आहे. आणि सरासरी पाऊस ७५ टक्के पेक्षा कमी पडल्याने तालुका दुष्काळी जाहीर होण्यास पात्र ठरतो. मात्र तरीही तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झालेला नाही. शासनाने निकषाप्रमाणे जनतेला न्याय द्यावा.- कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी आमदार अमळनेर

