
वैद्यकीय अधीक्षकांनी अधिपरिचारिकेस बजावली शोकॉज नोटीस…
अमळनेर:- तालुक्यातील अमळगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेला व्यवस्थित सलाईन न लावल्याने त्यांना सेफ्टीक झाल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या संदर्भात संबंधित परिचारिकेला ग्रामीण रुग्णालय अधिक्षकांनी शोकॉज नोटीस बजावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भारती भारत पाटील यांच्या आईला २१ ऑक्टोबर रोजी जुलाब, उलट्या होऊ लागल्याने त्या उपचारासाठी अमळगाव येथील रुग्णालयात दाखल झाल्या. यावेळी कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार त्यांच्यावर अधिपरिचारिका एम.सी. पांचाळ यांना उपचार करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी महिलेस सलाईन लावली. परंतु ही सलाईन लावताना त्यांनी हलगर्जीपणा केला. तसेच त्यांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना याची कोणताही माहिती दिली नाही. त्यामुळे उपचार घेणाऱ्या या महिलेस हाताला शेफ्टीक झाली. त्यामुळे त्यांच्या हातावर मोठी जखम झाली. अखेर हे उपचार त्यांच्या जीवावर बेतल्याने त्यांना तातडीने अमळनेर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केल्याने या महिलेचा जीव व हात वाचला आहे. त्यामुळे अमळगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करणाऱ्या नर्सवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या महिलेची मुलगी भारती पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन संबंधित नर्सला कारणे दाखवा (शोकॉज) नोटीस बजावण्यात आली आहे.

