मात्र भारतीय संघाच्या पराभवामुळे झाली क्रिकेटप्रेमींची निराशा…
अमळनेर:- शहरात जि. प. विश्रामगृहात क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना डिजिटल स्क्रीनवर पाहण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली होती. मात्र पराभवामुळे क्रिकेट प्रेमींची निराशा होऊन जल्लोष करण्याची अमळनेरकरांची संधी हुकली.
क्रिकेट प्रेमींचा ग्रीन अमळनेर ग्रुप, डॉक्टरांची आयएमए संघटना आणि अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघातर्फे सदरचे आयोजन करण्यात आले होते. सुरवातीला सकाळी मंत्री अनिल पाटील यांनी उपस्थिती देऊन सेल्फी पॉईंट वर स्वतः सेल्फी काढून शुभारंभ केला.त्यानंतर माजी आमदार डॉ बी एस पाटील, माजी आमदार स्मिता वाघ,खा शी मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ अनिल शिंदे, संचालक कल्याण पाटील, सौ राजश्री कल्याण पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन पाटील, आयएमएचे डॉ संदीप जोशी, डॉ शरद बाविस्कर, डॉ अनिल वाणी,भाजप तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,शिवसेना तालुकाप्रमुख श्रीकांत पाटील, भाजप वाहतूक सेलचे जिल्हाध्यक्ष अजय केले,अर्बन बँक संचालक रणजित शिंदे व मान्यवरांच्या उपस्थितीत स्क्रीनचे माल्यार्पण होऊन शुभारंभ करण्यात आला. आलेल्या सर्व मान्यवरांनी स्वतः सेल्फी काढून उत्साह वाढविला, याठिकाणी उत्तम बैठक व्यवस्था व थंड पाण्याची व्यवस्था असल्याने सामना सुरू झाल्यापासूनच गर्दी झाली होती. चौकार व षटकार मारताच ढोल ताश्यांचा गजर व फटाक्यांची आतषबाजी होत होती. विशेष म्हणजे महिला देखील सेल्फीसह सामना पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित झाल्या होत्या. राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांच्या कडून चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.भारताने सामना जिंकल्यास कुणी बँड पथक, कुणी ताशे, कुणी डीजे तर कुणी जेवण जाहीर केल्याने मोठा जल्लोष विजयायानंतर येथे साजरा होणार होता. मात्र सुरवातीला असलेला उत्साह पराभवाच्या भीतीने कमीकमी होत गेला,दुसऱ्या विनिंगला तर प्रचंड मोठी गर्दी झाली असताना शेवटी भारत सामना हारून ऑस्ट्रेलियाचा संघ विजयी ठरल्याने सारेच जण निराश होऊन घरी परतले. मात्र अमळनेर येथे आयोजकांनी यानिमित्ताने साऱ्यांना एकत्र आणून उत्तम नियोजन केल्याने ग्रीन ग्रुप, आयएमए व अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे सर्वांनी आभार व्यक्त केले.यावेळी शहरातील डॉक्टर्स, पत्रकार बांधव, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, नोकरदार वर्ग, विद्यार्थी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.यासाठी अमळनेर येथील अंबिका स्टुडिओ व पटेल डी जे यांचे अनमोल सहकार्य लाभले.