
आरोपी फरार, मात्र १ लाख ७० हजाराचा मुद्देमाल केला जप्त…
अमळनेर:- चोपडा तालुक्यातील बुधगाव फाट्याजवळ अमळनेर उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील नंदवाळकर यांच्या पथकाने २० किलो गांजासह १.७० लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
२९ रोजी अमळनेर उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील नंदवाळकर यांना गांज्याची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने त्यांनी पीएसआय विलास पाटील, पोना प्रमोद बागडे, पोना हितेश बेहरे, पोकॉ गणेश पाटील यांचे पथक व चोपडा पोलिसांचे पथक बुधगाव फाट्याजवळ नजर ठेवून असताना सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास एक इसम पेट्रोलच्या टाकीवर गोणी ठेवून येताना दिसला. त्या दुचाकीस्वाराला संशय आल्याने तो पोते व दुचाकी सोडून पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला मात्र तो काटेरी झुडुपातून पळून गेला. तो सोडून गेलेल्या पोत्यात पाहणी केली असता त्यात हिरवट रंगाची ओलसर गांजाचा पाला व फुलबिया दिसून आल्या. घटनास्थळावरून २० किलो वजनाचा एक लाख वीस हजार किमतीचा गांजा, ५० हजार किमतीची होंडा शाईन दुचाकी क्रमांक एमएच १८ सीए ३१५१ असा १.७० लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोना बागडे यांच्या फिर्यादीवरून पळून गेलेल्या इसमाविरुद्ध अंमली पदार्थ अधिनियम सन १९८५ चे कलम २० व २२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीआय कावेरी कमलाकर ह्या करीत आहेत.
दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील नंदवाळकर व त्यांच्या पथकाने कार्यक्षेत्रात सुरू केलेल्या अवैध धंदे, व अंमली पदार्थ विरोधी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

