श्रीक्षेत्र कपिलेश्वर येथे संस्थानचे पदाधिकारी आणि परिसरातील भाविकांनी केला सत्कार…
अमळनेर:- अखिल भारतीय संत समितीचे निर्देशकपदी तापी- पांझरा संगमावरील श्रीक्षेत्र कपिलेश्वर संस्थानचे मठाधिपती महामंडलेश्वर १००८ श्री हंसानंदतीर्थ महाराज यांची निवड करण्यात आली असून ८ रोजी श्रीक्षेत्र कपिलेश्वर येथे सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अ.भा. संत समितीचे मुख्य निर्देशक निर्मल पीठाधीश्वर महंत ज्ञानदेवसिंहजी, जगदगुरू कैवल्यज्ञान पीठाधीश्वर स्वामी अविचल देवाचार्य महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड प्रक्रिया संपन्न झाली. संत समिती वाराणसीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगदगुरू आचार्य श्रीअविचलदेवाचार्य तथा राष्ट्रीय महामंत्री स्वामी जीतेंद्रानंद सरस्वती यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र प.पू. हंसानंदतीर्थजी महाराज यांना प्राप्त झाले आहे. संत समितीत अतिशय महत्वपुर्ण समजले जाणारे निर्देशक पद कपिलेश्वर मठाधिपती यांना लाभल्याचे समजताच कपिलेश्वर संस्थानचे विश्वस्त मंडळ, सचिव मगन वामन पाटील व मुडावद-निम पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी प.पू. हंसानंदजीतीर्थ महाराजांचा पाद्य पूजनाने सत्कार केला. ८ रोजी शुक्रवारी महाराजांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. याप्रसंगी माजी जिप सदस्य शांताराम साळुंखे, संदिप घोरपडे, भागवत पाटील, संस्थानचे पदाधिकारी सी एस पाटील, घनश्याम अग्रवाल, इंजि. दुसाणे, तुकाराम चौधरी, सुदाम पाटील, छोटु आप्पा, दिनेश तात्या, डॉ. एल. डी. चौधरी, मंगेश पाटील, ललित वारुळे, सुरेश पवार, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्विय सहाय्यक नवलसिंग राजे, भूपेशभाई पटेल, नागेश्वर संस्थान विश्वस्त शत्रुघ्न पाटील, भैरवनाथ संस्थानचे पदाधिकारी, तसेच जळगाव व धुळे जिल्हयातील जवळपास तीनशे भाविक उपस्थित होते.
प.पू. महामंडलेश्वर हंसानंदजीतीर्थ महाराज हे मुळ शिरपूर तालुक्यातील सावळदे गावाचे रहिवासी असून अल्पवयातच अध्यात्माकडे वळले अन बालब्रम्हचारी वेषात संपुर्ण भारतभर भ्रमण करून बाराबंकी (उत्तर प्रदेश) येथे त्यांनी दीक्षा घेतली. राज्याराज्यात भ्रमंती करत अडगळीत देवालयाचा त्यांनी कायापालट केला. २५ वर्षापूर्वी असेच भटकंतीत तापी- पांझरा संगमावरील पुरातन श्रीक्षेत्र कपिलेश्वर देवस्थानावर ते स्थिरावले. सन २००९ मध्ये त्यांनी जगदगुरू शंकराचार्यांच्या अध्यक्षतेखाली कपिलेश्वर येथे अखिल भारतीय संत समितीचे महाअधिवेशन भरविले होते. तापी-पांझरा संगमावर त्यांनी भव्य आश्रम, भक्त निवास, गोशाळा, वेदपाठशाळा सुरू केलेल्या आहेत.