पूर्वसूचना न देता कोणत्याही क्षणी प्रांत कार्यालयाबाहेर उपोषणाला बसण्याचा इशारा…
अमळनेर:- दोन वर्षांपूर्वी २०२१ साली झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसाने झालेल्या पिकांची नुकसान भरपाई अथवा शासन अनुदान अद्याप मिळालेले नाही ते तात्काळ मिळावे अशी मागणी शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.
२०२१ साली ८ सप्टेंबर आणि १ व २ ऑक्टोबर रोजी अवकाळी अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. १७० हेक्टर उडीद, २३०६ हेक्टर मका, ६०६ हेक्टर ज्वारी, २७५ हेक्टर सोयाबीन, ३५ हेक्टर तीळ, २१२ हेक्टर बाजरी, ११ हेक्टर भुईमूग, ४३ हजार २५१ हेक्टर कापूस, २ हेक्टर सुर्यफुल पिकाचे नुकसान झाले होते. त्यात ६१ हजार १६९ शेतकऱ्यांचे ४६ हजार८७० हेक्टर क्षेत्र जिरायती पिकाखालील क्षेत्राचे ,तर ७९५ शेतकऱ्यांचे ३४४ हेक्टर बागायती आणि १०७ शेतकऱ्यांच्या फळपिकांचे ६८ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. यासंदर्भात नुकसानीचे पंचनामे करून तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार यांनी ३२ कोटी ४६ लाख रुपये अपेक्षित निधीचा अहवाल देखील पाठवला होता. मात्र आजपर्यंत नुकसान भरपाई अथवा मोबदला मिळालेला नाही. तरी २०-२५ दिवसांच्या आत नुकसानीचा मोबदला आमच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावा अन्यथा पूर्वसूचना न देता कोणत्याही क्षणी प्रांत कार्यालयाबाहेर उपोषणाला बसू असा इशारा दिलीप पाटील, मधुकर पाटील, बुधा मोरे,अशोक साळुंखे, प्रकाश पाटील, भगवान पाटील, भूषण साळुंखे,घनश्याम पाटील, पांडुरंग पाटील, विश्वास पाटील, राजेंद्र कोळी, सुरेश लोहार, रोहिदास पाटील, जिजाबराव पाटील, रमेश साळुंखे, चंद्रकांत चौधरी, योगेश बडगुजर, पुरुषोत्तम पाटील, बाबुराव पाटील, भाईदास पारधी, जिजाबराव जगताप, अशोक लोहार, हिम्मत साळुंखे, कैलास चौधरी, शरद पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, कृषी अधिकारी, तहसीलदार यांना पाठवण्यात आल्या आहेत.