अमळनेर:- शहरातील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल [सी.बी.एस.ई.] येथे गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांना गणित विषय कठीण व कंटाळवाणा वाटतो. विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताविषयी असणारी भीती दूर करून त्यांची गणित विषयात रुची, आवड निर्माण व्हावी तसेच गणितीय संकल्पना मनोरंजक पद्धतीने समजावे या उद्देशाने “आंतरराष्ट्रीय गणित दिवस” आनंदात साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक विनोद अमृतकर यांनी थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर शाळेतील गणित विषय शिक्षिका नंदिनी देशपांडे यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवन कार्याविषयीची माहिती दिली. तसेच जीवनात गणित किती महत्त्वाचे आहे तेही पटवून दिले. शाळेतील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे नृत्य करून गणित विषयाचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या समोर सादर केले. तसेच इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांनी शकुंतला व रामानुजन यांचा हुबेहूब असा प्रसंग ही विद्यार्थ्यांसमोर सादर केला. आंतरराष्ट्रीय गणित दिनानिमित्त शाळेत अनेक स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात रुबिक क्यूब, सुडोकू हे गणितीय खेळ घेण्यात आले व विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचे कौतुक केले.त्यानंतर शाळेचे गणित हा एक विषय नसून तो आपल्या जीवनाचा अविभाज्य असा घटक आहे हेही पटवून दिले. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक विनोद अमृतकर यांनीही श्रीनिवास रामानुजन यांच्या विषयीची माहिती दिली व गणिताचे अमूल्य असे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक दिनेश शेलकर व नयना पाटील यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम शाळेच्या गणित विभागाच्या संकल्पनेतून पार पडला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.