शेकडो रामभक्तांनी घेतला सहभाग, सर्वत्र झाला रामनामाचा गजर…
अमळनेर:- राम मंदिर अयोध्या येथुन आलेल्या अक्षता कलशाची काल अमळनेरात उत्साहात रथयात्रा काढण्यात आली. महिला भगिनींसह शेकडो रामभक्तांचा यात सहभाग होता. यानिमित्ताने शहरभर रामनामाचा गजर झाला.
सदर यात्रेत कपिलेश्वर संस्थानचे स्वामी हंसानंदतीर्थ, नंदगाव श्रीराम मंदिराचे गोविंददासजी महाराज तसेच मंत्री अनिल पाटील यांच्यासह असंख्य लोकप्रतिनिधी व मान्यवर यानीही यावेळी उपस्थिती दिली. साडे पाचशे वर्षांच्या अथक परिश्रमानंतर न्यायालयीन पुराव्याने अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर होत असून या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत पार पडणार आहे. या निमित्त संपूर्ण देशभरात अयोध्येतून पूजीत असे अक्षता कलश पाठवले गेले आहे.आणि या अक्षता 1 ते 15 जानेवारी या काळात सर्व राम सेवकांकडून प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यात प्रत्येक घरापर्यंत पोहचवल्या जाणार आहेत. या अक्षता कलशाची शहरातील श्री रामजन्मभूमी आनंद उत्सव समिती, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांच्या द्वारे भव्य रथ यात्रा मिरवणूक दिनांक 25 डिसेंबर रोजी श्री स्वामीनारायण मंदिरातून काढण्यात आली. सकाळी 9 वाजता स्वामीनारायण मंदिरात मंदिराचे संत यांच्या उपस्थितीत अमळनेर तालुका संघचालक डॉ चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कलशाचे पूजन होऊन नंतर खाशी मंडळाचे संचालक हरी भिका वाणी मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली,त्यानंतर उपस्थित असलेले श्री हंसानंद तीर्थजी महाराज यांच्या हस्ते अक्षदा कलश श्री रामजन्मभूमी आनंद उत्सव समितीचे अध्यक्ष सरजू गोकलानी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्यांनी सजावट केलेल्या रथावर कलश ठेवला, यावेळी दर्शनासाठी मोठी गर्दी याठिकाणी झाली होती,रथ यात्रेत श्री मंगळग्रह संस्था व गायत्री मंदिराचे सेवेकरीही सहभागी झाले होते तर एका रथात स्वामी हंसानंद तीर्थ महाराज व गोविंददासजी महाराज हे विराजमान झाले होते. सर्वांनी डोक्यावर भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या,अनेकांनी डीजेच्या तालावर रामधूनवर ठेका धरला. मंत्री अनिल पाटील हे उपस्थित झाल्यानंतर त्यांच्याहस्ते कलशास माल्यार्पण करण्यात आले. त्यानीही तरुणाई सोबत ठेका धरून सर्वांचा उत्साह वाढविला. सदर रथयात्रा सुभाष चौक ,दगडी दरवाजा,वाडी चौक,भोई वाडा, माळी वाडा, झामी चौक,पवन चौक, तिरंगा चौक ,बस स्टँड आणि शेवटी विजय मारुती मंदिर येथे समारोप करण्यात आला. वाटेत अनेकांनी दर्शन घेतले.
सदर रथ यात्रेत भाजपा ओबीसी सेलच्या प्रदेश सरचिटणीस सौ भारती सोनवणे, ॲड ललिता पाटील, माजी जिप सदस्य ॲड. व्ही आर पाटील,प्रा. धर्मसिंग पाटील, बजरंगलाल अग्रवाल, मुंदडा फाऊंडेशनचे अमेय मुंदडा,खाशी मंडळाचे संचालक नीरज अग्रवाल, प्रदीप अग्रवाल, अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपुत,भाजप तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष विजय राजपूत, मार्केटचे माजी संचालक पराग पाटील,डॉ मिलिंद नवसारीकर, विनोद अग्रवाल, ॲड विवेक लाठी, प्रितम मणियार,लालू सोनी,नपचे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, प्रशासन अधिकारी संजय चौधरी,सोमचंद संदानशिव,दिनेश नाईक, कपिल दलाल,एल टी पाटील यासह असंख्य मान्यवर सहभागी झाले होते.
सदर रथयात्रेसाठी समितीचे अध्यक्ष सरजू गोकलानी, सदस्य नीरज अग्रवाल,विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ संजय शाह, बजरंग दलाचे अध्यक्ष यासह असंख्य सेवकांनी परिश्रम घेतले. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता,सदर मिरवणूक शांततेत पार पडली.