
अमळनेर:- तालुक्यातील पाडळसरे येथे दिनांक २ फेब्रुवारी रोजी सालाबादप्रमाणे यावर्षीही ग्रामदैवत मरिआईचा यात्रोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होत आहे.
पाडळसरे येथे गेल्या पाच ते सहा वर्षापासून मरिआईची यात्रा भरावयास प्रारंभ झाला. येथील माजी उपसरपंच भिला साळुंखे यांनी गावातील ग्रामस्थांच्या मदतीने हि यात्रा भरावयास सुरुवात केली आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून पाडळसरे या गावाचे नवीन पुनर्वसन समायोजन झाले आहे. तापी नदी काठावर वसलेले नाटेश्वर महादेव मंदिर व गावात असलेलं मरीआई मातेचे मंदिर याच जुन्या गावी स्थित असल्यामुळे आजही यात्रा याच ठिकाणी संपन्न होत असते, हे विशेष. गावातील इडा पीडा दूर सारणाऱ्या मरीआईच्या या, यात्रोत्सवात गावातील महिला अबाल वृद्ध स्वयंपूर्तीने सहभागी होत असतात. गावातील व परीसरातील श्रोते यांच्या लोकमनोरंजनासाठी सुकलाल भाऊ बोराडीकर यांचा लोक नाट्य तमाशा मंडळचा कार्यक्रम होणार आहे.
दरम्यान बुधवारी होणारा यात्रोत्सव कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करीतच संपन्न होणार असल्याचे देखील आयोजकांनी कळविले आहे. या यात्रोत्सव काळात हॉटेल्स, झुले पाळणे, खेळणी दुकाने, संसारोपयोगी साहित्य दुकानदार यांनी दुकाने थाटावी तसेच यात्रा काळात शांतता राखावी असे आवाहन पाडळसरे ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.









