हिट अँड रन कायदा रद्द करण्यासाठी प्रांत कार्यालयावर काढला मोर्चा…
अमळनेर:- शासनाच्या हिट अँड रन कायदा रद्द करण्यासाठी काल अमळनेर तालुका ऑनर्स अँड ड्रायव्हर असोसिएशनने प्रांत कचेरीवर मोर्चा काढून निवेदन दिले.
शहरातील सर्व चालक संघटना एकत्रित होऊन घोषणा देत प्रांत कचेरीवर मोर्चा काढला. निवेदनात म्हटले आहे की, केंद्र शासनाच्या नव्या हिट अँड रन कायद्यांतर्गत ड्रायव्हरला दहा वर्षे शिक्षा व सात ते दहा लाखाचा दंड आहे. मुळातच चालकाला ३ ते १० हजार पगार असतो तो एवढा दंड भरू शकत नाही, तसेच शासन म्हणते की, अपघात झाल्यास चालकाने अपघातग्रस्त व्यक्तीस दवाखान्यात नेले पाहिजे पण जर चालक तेथे थांबला तर त्याचाच घात होण्याची शक्यता आहे. दुचाकीस्वार केव्हाही मोठ्या वाहनात घुसतो आणि मोठ्या वाहनचालकांवर गुन्हा दाखल होतो. त्यामुळे शासनाने नव्या हिट अँड रन कायदा रद्द करावा आणि त्यात सुधारणा करावी अशी मागणी करण्यात आली असून मागणीसाठी त्यांनी २ जानेवारीपासून बंद पुकारला आहे.
यावेळी ट्रान्सपोर्ट संघटनेचे सुभाष चौधरी, चालक मालक संघटनेचे धनराज पाटील, नरेश पाटील, संतोष जरे, जयंत पाटील, बापू महाजन, गोटू मराठे, बंडू नाना, गणेश बडगुजर, सचिन बैसाणे, अविनाश नगराळे, निखिल शिंदे, आण्णा पाटील, चंद्रसिंग राजपूत, धनंजय बागुल हजर होते.
ट्रान्सपोर्टचा बंद असल्याने एसटी बसला गर्दी होती. तसेच पेट्रोल पंपांवर पेट्रोल भरण्यासाठी दुचाकीस्वारांनी चांगलीच गर्दी केली होती. एकाच वेळी जास्त ड्रम व इतर भांड्यांमध्ये जादा पेट्रोल भरण्यासाठी गोंधळ उडत होता. अखेर तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी पेट्रोलपंपांवर भेटी देऊन प्रत्येकाला मर्यादित पेट्रोल देण्याची ताकीद पंपमालकांना देण्यात आली.