अमळनेर:- येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा आय क्यू. ए.सी. विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.
धनदाई महाविद्यालयाच्या यशवंत सभागृहात आयोजित या कार्यशाळेत विद्यापीठाच्या रसायनशास्त्र प्रशाळेचे विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ.दिपक दलाल यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील, कला महाविद्यालय मारवडचे प्राचार्य. व्ही. एस. देसले अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षणाच्या क्षेत्रात अमुलाग्र बदल होणार असून नवे शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारे, त्यांना विविध क्षेत्रातील जीवन उपयोगी कौशल्य शिकवणारे, विद्यार्थ्यांना कला, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमात सहभागाबद्दल श्रेयांक मिळविण्याच्या पद्धतीचा अवलंब करीत असून लवचिकता व बहुविद्याशाखीय दृष्टिकोन ही या नवीन शैक्षणिक धोरणाची वैशिष्ट्ये असून या धोरणाच्या यशस्वी अंमलबजावण्यासाठी सर्व घटकांनी प्रयत्न करावे, असे आव्हान प्रा. डॉ. दिपक दलाल यांनी केले.
यापूर्वी कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठ गीताने करण्यात आले. प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात समावेशकता वाढावी म्हणून नवीन शैक्षणिक धोरण विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगत विद्यापीठाने घेतलेल्या पुढाकाराबद्दल विद्यापीठाचे आभार व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. देसले यांनी या कार्यशाळेमुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक या घटकांना धोरण समजण्यास निश्चित मदत होईल अशी आशा व्यक्त केली.
या कार्यशाळेसाठी जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयाचे इयत्ता 12 वी चे विद्यार्थी तसेच मारवड व धनदाई महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. लिलाधर पाटील यांनी केले तर आभार डॉ. किशोर पाटील यांनी व्यक्त केले. राष्ट्रगीताने कार्यशाळेचा समारोप करण्यात आला. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.