अन्यथा २६ जानेवारीपासून आंदोलन करण्याचा सदस्यांनी दिला इशारा…
अमळनेर:- संगनमताने आर्थिक गैरव्यवहार करीत मनमानीने कारभार चालवणाऱ्या ग्रामसेवक आणि सरपंचावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा २६ जानेवारीपासून आंदोलन करण्याचा इशारा तालुक्यातील झाडी येथील ग्रामपंचायत सदस्यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, झाडी ग्रामपंचायतचा कारभार हा भोंगळ, भ्रष्ट, एकाधिकार अनागोंदी सुरू आहे. ग्रामसेवक व सरपंच संगनमताने वेगवेगळे आर्थिक गैरव्यवहार, बनावट दस्तऐवन निर्माण करणे, खोटया सह्या घेऊन सभा घेणे, ग्रामसभा, महिला सभा आयोजित न करणे, विषय विकास समित्या नसणे, सेवा हक्क, माहिती अधिकार फलक न लावणे, अनधिकृत वृक्षतोड व असे खर्च, वृक्षारोपण व संगोपन दुर्लक्ष, पाणीपुरवता नसणे, सार्वजनिक शौचालय, मुतारीत प्रचंड अस्वच्छ व तसेच वित्त आयोगाच्या, विकास आराखडा, अंदाजपत्रक जामाचा संदर्भात विश्वासात न घेणे व निविदा प्रक्रिया न करणे व शासकीय मापदंड न पाळणे, सरपंच अपात्र प्रकरण, सरपंचाचे गावठाणा वर अतिक्रमित घर अधिकृत करणे त्यासंबंधी न्यायालयात ग्रामपंचायतीची बाजू पक्षपाती असणे, इतिवृत्त वेळवर न लिहणे त्यात फेरफार करणे, वैयक्तिक लाभाच्या योजना लोकांपर्यंत न सांगणे आदि या बाचत तक्रारी आहेत. ग्रामपंचायत सदस्य असून देखील आमच्या अधिकार हननाबाबत देखील लेखी तक्रार ग्रामसेवक सरपंच, गटविकास अधिकारी यांच्याकडे वारंवार वर्षभरापासून करत आहोत. परंतु अद्यापपावेतो त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे २६ जानेवारी रोजी अमळनेर तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार आहोत. तरी प्रशासनाने तात्काळ ग्रामपंचायतीचे संपूर्ण दप्तर जमा करून कार्यवाही करावी अन्यथा उपोषणाला आपली परवानगी आहे असे गृहीत धरून होणाऱ्या परिणामाची जबाबदारी आपली असेल, असा इशारा सदस्य निंबा लोटन पाटील आणि कलाबाई वसंतराव पाटील यांना दिला आहे.