अमळनेर:- रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या १५१ होमसाठी १११ गोशाळांची गोकाष्ठ सामुग्री वापरण्यात आली. त्यात अमळनेरच्या गोकुळ ग्रामच्या गोकाष्ठाचाही समावेश होता. या राष्ट्रीय सोहळ्यात अमळनेरलाही बहुमान मिळाला ही अभिमानाची आणि अमळनेरच्या भक्ती संस्कृतीचा सन्मान असल्याची माहिती राजकुमार छाजेड यांनी दिली.
रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातील १११ गोशाळांच्या माध्यमातून क्लस्टर बनवण्यात आले आहे. त्या सर्व ठिकाणाहून गोकाष्ठ मागवण्यात आले होते. गायीचे शेण, दुर्वा, चंदन,गुलाब जल, वैदिक सामुग्री पासून अग्निकुंडात होम हवन मध्ये टाकण्यात येणारी सामुग्री बनवण्यात आली होती. अमळनेरच्या गोकुळग्राम मध्ये डॉ योगेंद्र सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली गोकाष्ठ उत्पादन सुरू झाले आहे. कत्तलखान्यात जाणाऱ्या गायी वाचवून त्यांच्या शेण आणि गोमूत्रापासून विविध उत्पादने गोकुळग्राममध्ये बनवली जात आहेत. यापुढेही होम हवनसाठी गोकाष्ठ पाठवण्यात येईल असेही छाजेड यांनी सांगितले.
दरम्यान प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात शंख वादक, सायकल यात्रेकरू आशिष दुसाने, कपिलेश्वर मंदिराचे मठाधिपती स्वामी हंसानंद तीर्थ आणि गोकुळग्रामचे गोकाष्ठ यांना सन्मान मिळाल्याने तालुक्यात आनंद पसरला होता.
नित्यनियमांसाठी प्रसाद महाराजांनी अयोध्येला जाणे टाळले…
संत सखाराम महाराजांच्या गादीचे वारसदार हभप प्रसाद महाराज यांना देखील अयोध्येचे निमंत्रण आले होते. मात्र अडीचशे वर्षापासून गादी पुरुषांच्या पूजा अर्चा, भक्तांच्या घरी भेटी, पायी दौरे या नित्यनियमात बदल झालेला नाही. प्रसाद महाराजांच्या मातोश्रींचे निधन झाले होते तेव्हा सुद्धा त्यांनी नित्य नियम चुकवला नव्हता. सहा महिन्यांनी ठरल्या वेळेवरच ते अमळनेरला परत आले होते. त्यामुळे त्यांनी नित्यनियम न तोडता रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणे टाळले. मात्र तोच मुहूर्त साधत त्यांनी देवगाव येथे आमदार चिमणराव पाटील यांच्या उपस्थितीत रामाची प्राणप्रतिष्ठा केली.