विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे केले अनावरण…
अमळनेर:- येथे आयोजित १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्हाचे अनावरण प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अजिंठा विश्रामगृह येथिल कार्यक्रमात जळगांवच्या माजी महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.विद्रोहाच्या बोधचिन्हातून विद्रोह करत उसळणारा हात जणू क्रांतीचा मोठा बाणच आहे असे यावेळी जयश्री महाजन यांनी सांगितले.
पुणेस्थित प्रख्यात सुलेखनकार व चित्रकार,विविध वृत्तपत्रातून ग्राफिटी सदर चालविणारे प्रभाकर भोसले यांनी विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह बनवले आहे. त्याचे अनावरण आज जळगाव येथे विद्रोही मराठी साहित्य संमेलन समितीच्या कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षा जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा शिवमती लिनाताई पाटील, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष सुरेश पाटील, विद्रोहीचे संयोजक करीम सालार यांनी संमेलन यशस्वीतेचे आवाहन केले. विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष मुकुंद सपकाळे, पाटील बायोटेकचे प्रमोद पाटील, सातपुडा ग्रुपचे डी.डी. बच्छाव, कार्याध्यक्ष राम पवार, सुरेंद्र पाटील, लेखक प्रा.डॉ.देवेंद्र इंगळे, कवी प्रा.डॉ.सत्याजित साळवे, सुरेंद्र पाटील, प्रा.गोपाळ दर्जी, बापू पानपाटील, दिलीप सपकाळे, प्रितीलाल पवार, वाल्मिक सपकाळे, अविनाश आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात मुख्य संयोजक प्रा.डॉ.लिलाधर पाटील यांनी समता,स्वातंत्र्य, बंधुता या मूल्यांवर आधारित नवसमाजनिर्मिती साठी प्रस्थपित सांस्कृतिक रचनाना नकार देणे आवश्यक असल्याचे मनात घेऊनच म.फुलेंनी मराठी ग्रंथकार सभेला आव्हान देत पर्याय निर्माण करण्याचे ठरवले. याला प्रमाण मानून विद्रोही सांस्कृतिक चळवळीने प्रस्थापित संमेलने उधळण्यापेक्षा बहुजनांचा स्वाभिमान जागवणारा पर्याय म्हणून आजवर १७ विद्रोही साहित्य संमेलने भरवून उभा केला आहे असे सांगितले. सूत्रसंचलन संमेलनाचे निमंत्रक रणजित शिंदे यांनी सूत्रसंचलन केले. आभार संयोजक डॉ.मिलिंद बागुल यांनी मानले.
विद्रोह हे क्रांतीचे प्रतिक असते त्यामुळे त्यात प्रचंड ऊर्जा असते परंतु प्रत्येकवेळी क्रांती किंवा नवनिर्मिती करण्यासाठी मोडतोड अभिप्रेत नसते , अनेकदा स्वतःची रेष मोठी करूनही विद्रोहाची भूमिका साध्य होते अशी भूमिका बोधचिन्हातून मांडत प्रस्थापितांच्या पारंपरिक मनोऱ्याच्या चौकटीपासून वेगळे निघून स्वतःचे काही उत्तम साकारायचे तर भूमिका उदात्ततेने व निडरपणे घेत गतिशील असायला हवी हेच सदरच्या बोधचिन्हात सखोलपणे दाखवले आहे. प्रस्थापित पारंपरिक चौकटींमध्ये साहित्य, कला व त्यांचे धुरीण अडकलेले असताना आपला आवाज बुलंद करून निष्ठेने नीती व गुणवत्तेच्या बळावर स्वतंत्र आत्मविश्वासाने वावरण्याची मनीषाच आपल्यामध्ये अधिकाधिक लोकांना जोडण्याची जाणीव निर्माण करते. संघर्ष आणि विद्रोह हा जगण्याचा पाया आहे व मुळात ती माणसं जोडत पुढे जाण्याची प्रक्रिया आहे ही दृष्टी विद्रोही साहित्य संमेलनाचे बोधचिन्हातून निश्चित दिसते. विद्रोह माणसं जोडण्याची क्रिया आहे.असे यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे संघटक किशोर ढमाले यांनी सदरच्या बोधचिन्हाच्या अर्थाबाबत मांडली.
एका सर्जनशील सकारात्मकवृत्तीने चौकटी भेदून सतत पुढे जाण्याची आणि उन्नत होत राहण्याची भूमिका यातून अभिव्यक्त होते. काळ्या पांढऱ्या रंगातून दाखवलेले बाण हे सामान्य आणि पारंपारिक विसंगतीपूर्ण गोष्टींचे प्रतिनिधीत्व करतात. ते अस्पष्ट दिसतात तर त्यातून विद्रोह करत उसळणारा हात म्हणून क्रांतीचा बाण मध्यभागी, सूस्पष्ट व मोठा दाखवण्यात आला आहे. सदरचा बाण अंधःकार भेदण्याच्या निर्धाराच ठळक प्रतिक आहे. केवळ दोन रंगात सुलेखनाच्या जादूने सुप्रसिद्ध चित्रकार प्रभाकर भोसले यांनी महात्मा फुलेंपासून १८ व्या विद्रोही साहित्य संमेलनापर्यंतची मराठी बहुजनांच्या आत्मभानाची वाटचाल रेखाटली आहे. चित्रात म हा मराठी व महात्मा फुले यांचे प्रतिक हि आहे.यंदाच्या अमळनेरच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीत होणाऱ्या १८व्या विद्रोही संमेलनाच्या बोधचिन्हात चित्रकार प्रभाकर भोसले यांनी सदरचा दृष्टीकोन पूर्ण सामर्थ्याने व्यक्त केला आहे असे यावेळी संयोजकांच्या वतीने बैठकीत सांगण्यात आले.या कार्यक्रमास श्रीकांत बाविस्कर, अविनाश तायडे, सोमा भालेराव,महेंद्र केदारे,सचिन पाटील, पंकज पाटील, रविंद्रनाना भावसार, संदिप सोनवणे,मधुकर पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.