“चाय वाले की लव्ह स्टोरी” शॉर्टफिल्म उतरतेय अनेकांच्या पसंतीला…
अमळनेर:- महाविद्यालयीन जीवनापासूनच बेस्ट अभिनेता म्हणून नावलौकिक मिळविणारा अक्षर ठाकरे आता शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून चांगलाच प्रकाशझोतात आला असून युट्यूबवर त्याची “चाय वाले की लव्ह स्टोरी” ही शॉर्ट फिल्म अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.
अमळनेर येथील आर के नगर येथील रहिवासी असलेला अक्षर मधुकर ठाकरे प्रताप महाविद्यालयाचा एम.ए. इंग्रजी द्वितीय वर्षाचा विद्यार्थी असून आपल्या भूमिकेत अत्यंत जिवंतपणा आणणारा का कलाकार भविष्यात सिनेसृष्टीत देखील चमकू शकेल, असे जाणकारांचे मत आहे.सुरवातीला “एनकाउंटर ब्लो” नावाच्या वेब सिरीजनंतर त्याची ही दुसरी शॉर्टफिल्म नुकतीच यु ट्यूब वर रिलीज झाली आहे.या शॉर्टफिल्म चे संपूर्ण शूटिंग पुण्यात झाले असुन तेथेच आशाये फिल्म कंपनीच्या माध्यमातून तो नुकताच रिलीज झाला आहे,यात अक्षर ठाकरे मुख्य भूमिकेत असून याव्यतिरिक्त पुणे येथील विना नायर, जितू वाल्मिकी, रितीक धानवे,दिशा राय, श्रावण खरात, अजीसन नायर आदींच्या भूमिका आहेत.तर धनश्री खरात यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे. या शॉर्टफिल्मचे आतापासूनच 3 हजारांच्या वर व्ह्यूअर्स झाले असून अशा या फिल्म कंपनीचे पाच लाखांच्या वर फॉलोवर्स असल्याने यु ट्यूब हा सिनेमा प्रचंड गाजत आहे.
“चाय वाले की लव्ह स्टोरी” सिनेमा एका चंदू नामक चहा विक्रेत्याच्या जीवनावर आधारित असून तीच मुख्य भूमिका अक्षर ने साकारली आहे,खरेतर मनोरंजनासोबतच यातील गरीब चंदू एका शिक्षित असलेल्या तरुणीच्या मागे कसा वेडा होतो आणि शेवटी व्हॅलेंनटाईन डेला त्याचा कसा अपेक्षाभंग होतो हेच यात साकारले असून तरुणपणी तुम्ही शिक्षणाच्या प्रवाहात असाल किंवा परिस्थिती अभावी कामधंद्यात असाल अश्यावेळी केवळ आपल्या करिअरकडे लक्ष द्या, मुलींच्या मागे लागत भावनिक होऊन स्वतः त्रास व नुकसान करून घेऊ नका हाच संदेश यातून अक्षर ने तरुणांना देण्याचा प्रयत्न केला आहे.
पुरुषोत्तम महाकरंडक मध्ये ठरला बेस्ट ऍक्टर…
अक्षरला सुरवातीपासून अभिनयाची आवड असताना प्रताप महाविद्यालयात त्याला खरी संधी मिळाली असून एम ए च्या प्रथम वर्षाला असताना “हायब्रीड” नाटक मध्ये त्याने मुख्य भुमिका साकारली. त्यानंतर एम ए च्या द्वितीय वर्षात असताना महाविद्यालयाच्या वतीने पुरुषोत्तम महाकरंडक या राज्यस्तरीय स्पर्धेत”तो पाऊस” आणि “टाफेटा” या नाटकात अतिशय उकृष्ठ भूमिका अक्षर ने साकारून खानदेश व मराठवाडा मध्ये बेस्ट अँक्टर म्हणून पारितोषिक तथा बहुमान त्याने प्राप्त केला. यामुळे प्रताप महाविद्यालयालाही बहुमान मिळाला.
अक्षर आता मोठ्या परद्यावरील एका मराठी सिनेमासाठी प्रयत्नशील असून अनेक सिरीयल तथा शो साठी देखील तो ऑडिशन देत आहे. त्याच्या या गाजत असलेल्या शॉर्टफिल्मला अमळनेरचे आमदार तथा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.आर के नगरातील अशोका मेन्स पार्लरचे ठाकरे यांचा तो सुपूत्र आहे.