२७ व २८ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजन…
अमळनेर:- देशभरातील मराठी गझलकारांच्या स्वागतासाठी अमळनेर नगरी सज्ज झाली आहे. पहिले अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन २७ व २८ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात होत असून साहित्य नगरीला पूज्य सानेगुरुजी साहित्यनगरी नाव देण्यात आले आहे.
खान्देश साहित्य संघातर्फे गझल संमेलन आयोजित करण्यात आले आहे. गझल सम्राट सुरेश भट यांचे नाव गझल मंचाला देण्यात आले आहे. नाट्यगृहात संपूर्ण तयारी झाली आहे. शहरात ठिकठिकाणी बॅनर झळकले आहेत. देशभरातून १७० गझलकार आपल्या गझल सादर करणार आहेत. ते ऐकण्यासाठी रसिक आतुरतेने वाट पाहत आहेत. खास श्रोत्यांसाठी २७ रोजी रात्री “हे जगण्याचे भाषांतर काळजाचा थेट काळजाशी संवाद ” हा संगीतमय गझल गायनाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी ‛ मराठी गझल : आजची व उद्याची आव्हाने’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. यात संजय गोरडे (नाशिक), शांताराम खामकर (अहमदनगर), अनंत नांदूरकर (अमरावती) हे सहभागी होणार आहेत. तसेच देशातील साहित्य व संस्कृती संवर्धन व वृद्धीसाठी शासकीय पातळीवर मदत व्हावी, शेतकऱ्यांसाठी कृषी व जलसिंचन क्षेत्रातील प्रलंबित प्रकल्प मार्गी लावून नवीन योजना राबवाव्यात आणि भरघोस निधी मिळावा, गझल आणि बोली भाषेतील साहित्य याना प्राथमिक ते उच्चशिक्षणपर्यंत अभ्यासक्रमात स्थान मिळावे, सर्व साहित्य प्रकार लेखन होत असलेल्या अहिराणी भाषेला अनुसूची ८ प्रमाणे संविधानिक दर्जा देण्यात यावा, आदी महत्वाचे ठराव करण्यात येऊन त्यावर चर्चा करण्यात येणार आहे.