राज्यातील ८० रुग्णवाहिका बंद असल्याचा राजकुमार छाजेड यांचा आरोप…
अमळनेर:- जळगाव जिल्ह्यात जनावरांसाठी असलेल्या दोन रुग्णवाहिका आल्यापासून बंद असल्याने जनावरांना आरोग्य सुविधा वेळेवर मिळत नसल्याने अनेक गायींना प्राण गमवावे लागले आहेत. राज्यातील सर्वच ८० रुग्णवाहिका बंद असल्याचा आरोप जय जिनेंद्र फाउंडेशनचे राजकुमार छाजेड यांनी पत्रकार परिषदेत केला.
छाजेड पुढे म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात गायी व जनावरांसाठी अद्ययावत ८० रुग्णवाहिका देण्यात आल्या होत्या. त्यासाठी १९६२ हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला होता. मात्र या क्रमांकावर फोन लावल्यास फक्त तुम्हाला काय आरोग्य सुविधा हवी आहे. पशु वैद्यकीय अधिकारी किंवा संबंधित अधिकारी पाठवतो, असे सांगितले जाते. शासनाने पशु रुग्णवाहिका पाठवल्या मात्र त्यासाठी कर्मचारी आणि पशु वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नाहीत. या रुग्णवाहिका धूळ खात पडल्या आहेत. यामुळे मोकाट गायींवर उपचार करता येत नाही. अनेक गायींचा मृत्यू होतो, असाही आरोप छजेड यांनी केला. ते पुढे म्हणाले की, नगरपालिका जनतेकडून मोकाट गुरांचा कर घेते मात्र प्रत्यक्ष कोंडवाडे नाहीत त्यामुळे भटक्या गायींना इंजेक्शन देऊन कत्तलखान्यात पाठवले जाते. पालिकेने कोंडवाड्यात भटक्या गायी जमा केल्यास गोशाळा त्यांची जबाबदारी घेईल. त्यामुळे पर्यावरण पूरक गोकाष्ठ बनवण्यास मदत होईल. तसेच गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश, हिमाचल या राज्यात गायींसाठी चाऱ्याला अनुदान दिले जाते. ते महाराष्ट्रात देखील देण्यात यावे या सर्व मागण्यांसाठी सोमवारी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल ,असा इशाराही त्यांनी दिला आहे.
त्याचप्रमाणे शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना अंडी देण्याचा कार्यक्रम बंद करावे, अंडी लहान मुलांसाठी घातक आहेत. अंड्यामुळे कॉलेस्ट्रोल वाढते. शासनाने समिती नेमून वैद्यकीय अहवाल तपासावेत. अंड्याऐवजी पपई सारखी पोषक शेतकऱ्यांची फळे मुलांना द्या ज्यामुळे शेतकऱ्यांच्या पपयीला ग्राहक आणि भाव देखील मिळेल अशीही मागणी केली.