
अमळनेर:- शहरातील बस स्थानकाच्या परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीत गॅस भरताना आग लागल्याने चारचाकी जळून खाक झाली आहे.
काल ८ फेब्रुवारी रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास जुन्या पोलीस लाईन जवळ अतिक्रमण करत उभारण्यात आलेल्या टपरीच्या आडोश्याला चारचाकीत गॅस भरणे सुरू असताना अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. या घटनेत चारचाकी पूर्णपणे जळून खाक झाली असली तरी बस स्टँड परिसरात वर्दळीच्या जागेत अवैध रित्या अतिक्रमण करून त्या ठिकाणी वाहनात अवैधरित्या गॅस भरून दिला जात होता. त्याठिकाणी अजून भरलेल्या गॅस हंडी दिसून आल्या. त्याचा यावेळी आगीमुळे स्फोट झाला असता तर मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. मात्र नगरपालिका व संबंधित प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून बसल्याची स्थिती असून एखादी मोठी घटना घडल्यावर हे अतिक्रमण व अवैध धंद्यांवर कारवाई करेल का ? असा सवाल सुज्ञ नागरिकांनी विचारला आहे.





