पू. साने गुरूजी माध्य. शिक्षक व इतर नोकर वर्गाच्या पतसंस्थेची निवडणूक चांगलीच रंगली…
अमळनेर:- एक उमेदवार बिनविरोध, स्वतःच्या पॅनलमध्ये महिला उमेदवार न मिळणे, सहकार पॅनलच्या प्रचाराला जमलेली गर्दी पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्याने आता बिनबुडाचे आरोप करून चांगल्या लोकांना बदनाम करण्याचा प्रकार सत्तेच्या हव्यास असणाऱ्यांनी केला आहे. डीडीआर वर दबाव टाकून सेवानिवृत्त सभासदांची नावे मतदार यादीतून वगळल्याचा आरोप करणाऱ्या बुद्धिवानाचे पितळ सभासदांमध्ये चांगलेच उघड पडले आहे. एक वर्षांपूर्वी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचा निघालेला निर्णय जर सत्ताधारी संचालकांना माहीत नसेल तर त्यांच्या ज्ञानाची कीव येते असे मतदारच बोलू लागल्याचे सहकार पॅनलकडून सांगण्यात आले आहे.
पूज्य साने गुरूजी माध्य. शिक्षक व इतर नोकर वर्गाची सह. पतसंस्थेची निवडणूक चांगलीच रंगली असून सहकार पॅनलला मतदारांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. यावेळी विरोधी पॅनलने केलेल्या आरोपांना उत्तर देताना सहकार पॅनलकडून धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या अंतर्गत सेवक सहकारी संस्था म्हणून मान्यता दिलेल्या संस्थेच्या आदर्श उपविधी क्रमांक ड १.१(१) तरतुदीनुसार सभासद सेवानिवृत्त झाला की संस्थेचा सदस्य असणे बंद होते. व कलम २५ प्रमाणे अशा सभासदांची नावे नोंदवहीतुन वगळावी लागतात. मात्र सेवानिवृत्त सभासदांना १४४-५ अ मधील तरतुदीनुसार त्यांच्या इच्छेने नाममात्र सभासद ठेवता येते. कलम २७(८) नुसार या सभासदांना मतदानाचा अधिकार राहत नाही. म्हणून राज्य निवडणूक प्राधिकरण lने १० फेब्रुवारी २०२३ रोजीच आदेश देऊन सेवानिवृत्त सभासदांची नावे प्रारूप यादीत समाविष्ट करू नये असे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्या आदेशानुसार जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी आणि तालुका निवडणूक अधिकारी यांनी मतदार याद्या तयार केल्या आहेत. तसेच जळगाव ग. स. ला हा नियम लागू नाही असे सांगणाऱ्या या संचालकला हे माहीत नाही की ग.स. निवडणूक झाल्यावर हे आदेश आले आहेत. मात्र पराभवाच्या छायेत असणाऱ्या आणि स्वतःला तज्ञ म्हणवणाऱ्या महाशयाने कॅमेऱ्यासमोर माईक हातात घेऊन दबाव टाकून डीडीआर कडून नावे वगळल्याचा आरोप केला. ही अतिशय हास्याची बाब आहे. ज्या संस्थेत आठ वर्षे सेवा केल्याचा दावा केला जातो त्याबाबत जर ज्ञान अवगत नसेल तर विनाकारण चिखलफेक करून कोणी बदनाम होणार नाही.
शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेत सर्व सुशिक्षित सदस्य आहेत. संचालक सुशिक्षित असताना पतपेढीचा अड्डा करायचा नाही म्हणतात. सहकार पॅनलचे उमेदवार तर सर्व नवखे आहेत मग अड्डा तुम्हीच केला होता की काय ? अशीही शंका उपस्थित मतदारांनी व्यक्त केली आहे. अस्वस्थ आणि व्यथित अवस्थेत आपण काय बोलतो ? याचे भान देखील सत्तापिपासू आणि लालसेने बरबटलेल्याना नसावे का ? याचीच जास्त चर्चा झाली आहे. स्वतःचा प्रचार करताना आणि करण्यासाठी आणलेल्या राजकीय नेत्यांना हे देखील भान नव्हते की पॅनल मध्ये आठ लोक आहेत आणि दहा लोक असल्याचे भासवले जात होते.
सहकार पॅनल मध्ये एन टी प्रवर्गाचा उमेदवार बिनविरोध निवडला त्यावेळी देखील विरोधकांनी तो आमचा असल्याचे भासवण्याचा केविलवाणा प्रकार केला. मात्र स्वतः रमेश चव्हाण यांनी त्यांचे बिंग फोडले. तिथे लबाडी उघडी पडल्यावरही त्यांची सत्तेची तडफड थांबलेली नाही. पतपेढीच्या निवडणुकीत दबाव आणला असता तर तीन अपक्ष उमेदवार निवडणूक लढले असते का ? की तुमच्या हेकडपणामुळे उमेदवार नसतानाही एकाच उमेदवाराचा अर्ज दोन ठिकाणी ठेवला. उलट त्या जागेवर आणखी एकाला संधी मिळाली असती याचा अर्थ स्पष्ट आहे की सहकार पॅनलचे दोन उमेदवारांचा विजय आजच निश्चित झाल्याने अस्वस्थ होऊन वाट्टेल ते बरळले जात आहे हे जाणकार मतदाराच्या लक्षात आले असल्याचे सांगितले आहे.