अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील कै. नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात क .ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या निर्देशानुसार महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग व युतीसभा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 13 फेब्रुवारी 2024 पासून पाच दिवसीय मिशन साहसी अभियान कार्यशाळा सुरू आहे.
सदर कार्यशाळेत काल दि. 15 फेब्रुवारी 2024 रोजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य माननीय प्रा.डॉ. शिवाजीराव पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.वसंत देसले तसेच प्रमुख वक्त्या म्हणून माननीय भारती गाला (संचालिका कलाश्री क्राफ्ट अमळनेर) या उपस्थित होत्या. मान्यवरांच्या सत्कारानंतर माननीय प्रा. डॉ. शिवाजीराव पाटील यांनी उपस्थित कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व त्यांची मते जाणून घेतली. तदनंतर माननीय भारती गाला यांनी स्वयंरोजगार ,कुटीर उद्योग, आणि ग्रामीण उद्योग याबाबत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले, तसेच त्यांच्या प्रश्नांचे निरसन करून मुलींना आत्मनिर्भर होण्यावर भर द्यावा, असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी विद्यापीठाच्या उपक्रमांची विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी विकास विभाग करीत असलेल्या विविध योजनांची माहिती देऊन विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. जितेंद्र माळी यांनी केले, तर सूत्रसंचालन कु. पूनम भिल तसेच आभार प्रदर्शन कु. रूपाली साळुंखे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
सदर कार्यक्रमास प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.