शेतकरी ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन झालेत सहभागी,तहसीलदारांना दिले निवेदन…
अमळनेर:- येथील महाविकास आघाडीतर्फे शासनाच्या निष्क्रियतेविरोधात तहसील कार्यालयावर “देता की जाता” या मागणीनुसार धडक मोर्चा काढण्यात आला.यावेळी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहापासून या आक्रोश मोर्चाला सुरवात झाली.मोर्चात अनेक शेतकरी ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन सहभागी झाले होते.यावेळी शासनाविरोधी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.दिवसें दिवस महाग होत चाललेली खते व बी – बियाणे त्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतकरी हैराण झाल्याचे विदारक चित्र तालुक्याभरात आहे तरी देखील सरकारला जाग येत नसल्यामुळे सरकारला भानावर आणण्यासाठी तालुका महाविकास आघाडीतर्फे भव्य शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे मविआ च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले .
सतत ४२ दिवस पावसाचा खंड पडूनही अमळनेर तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला नसून अमळनेर तालुक्यास दुष्काळी जाहीर करून २०२३ च्या खरीप हंगामासाठी दुष्काळी अनुदान मिळावे, फेब्रुवारी २०२४ मध्ये गारपीट, अवकाळी पाऊस व वादळ यामुळे झालेल्या नुकसानीचे हेक्टरी ५० हजार अनुदान तात्काळ देण्यात यावे, २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टी, अवकाळी पाऊस व गुलाबी वादळाचे अनुदान त्वरित वितरित करण्यात यावे, सर्व प्रकारच्या शेतमालास एम.एस.पी. जाहीर करण्यात यावा, महात्मा फुले शेतकरी सन्मान योजनेचे ५० हजार प्रोत्साहन पर अनुदान पात्र शेतकऱ्यांना देण्यात यावे, पी एम किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची निवड लवकरात लवकर करण्यात यावी, २०१९ च्या अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करून विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी, खत – बियाणे व शेतीचे अवजारे यांच्या किमती ५०% ने कमी करण्यात याव्यात, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत शेतमजुरांचा समावेश करण्यात यावा, आदी मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात आल्या.तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना वरील मागण्यांचे निवेदन देऊन मोर्चाची सांगता करण्यात आली.
मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार डॉ बी.एस.पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष शाम पाटील,प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील, काँग्रेस चे जेष्ठ नेते डॉ.अनिल शिंदे,उमेश पाटील,धनगर पाटील, उबाठा शिवसेनेचे अनंत निकम, शिवाजी दौलत पाटील, किसान काँग्रेसचे प्रा.सुभाष पाटील,सुरेश पिरन पाटील, बन्सीलाल भागवत, मुन्ना शर्मा,सुलोचना पाटील, मयूर पाटील,मनोहर पाटील, तौसिफ तेली, सचिन वाघ, कमल पाटील, बापू खुशाल पाटील, अरुण शिंदे,डी. एम. पाटील, अनिरुद्ध शिसोदे, सनी गायकवाड, तसेच महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
Related Stories
December 22, 2024