अधिग्रहित बोअरवेलवरून टँकर भरण्यास परिसरातील नागरिकांचा विरोध…
अमळनेर:- ग्रामीण भागातील टंचाई वर मात करण्यासाठी सिंधी कॉलनीतील अधिग्रहित केलेल्या बोअरवेल वरून त्या परिसरातील नागरिकांनी टँकर भरण्यास विरोध केल्याची घटना २६ रोजी घडली.
अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागात निसर्डी, लोणपंचम, शिरसाळे बुद्रुक, तरवाडे, नगाव बुद्रुक, लोण बुद्रुक, नगाव खुर्द, देवगाव देवळी, पिंपळे खुर्द ,चिमनपुरी, डांगर बुद्रुक, भरवस, आंचलवाडी, आटाळे, सबगव्हाण या पंधरा गावांना टँकर सुरू झाले आहेत. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. तर जनावरांना पाणी कोठून आणावे असा बिकट प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. प्रशासनाने विविध ठिकाणी विहिरी अधिग्रहित करून टँकर भरणे सुरू केले आहे.
टँकरग्रस्त पाच ते सहा गावांसाठी प्रशासनाने शहरातील नगरपालिकेच्या मालकीचा सिंधी कॉलनी परिसरातील बोअर अधिग्रहित केला आहे. दररोज तेथून टँकर भरले जात आहेत. दररोजचा मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा होत असल्याने त्या परिसरातील नागरिकांच्या बोअरला पाणी कमी झाल्याने २६ रोजी सकाळी नागरिकांनी टँकर भरण्यास मनाई केल्याने सायंकाळापर्यंत सर्व टँकर जागेवरच उभे होते. गावात वेळेवर पाणी पोहचले नाही. पालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी नागरिकांची समजूत घातल्यानंतर टँकर भरणे सुरू झाले नंतर पुन्हा नागरीकांनी विरोध केला.
प्रशासनाने दखल घेऊन आणि पर्यायी स्रोत शोधून ग्रामीण भागात टँकरचा खंड पडू देऊ नये, अशी मागणी पिंपळे येथील सरपंच वर्षा युवराज पाटील यांनी केली आहे.