जिल्हाधिकारी यांची भेट, दांडीबहाद्दरांना दिल्या नोटिसा…
अमळनेर:- येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशिक्षण महत्वाचे असून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्व प्रक्रिया समजून घेण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या. येथील प्रशिक्षण स्थळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट देऊन प्रशिक्षणवर्गाची माहिती घेतली. यावेळी सहा.निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा उपस्थित होते.
शहरातील ग्लोबल इंग्लिश मिडीयम स्कुल येथे दोन सत्रात १६५० कर्मचाऱ्यांनी निवडणूक पूर्व प्रशिक्षण घेतले.जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे.प्रशिक्षणाच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीत केंद्राध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी, द्वितीय मतदान अधिकारी तसेच सहाय्यक मतदान अधिकारी यांच्या कामांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी एका विधानसभा मतदारसंघातील ५० % मतदान केंद्रावर वेबकास्टिंग द्वारे कॅमेऱ्याची नजर राहणार असून तालुक्यात एकूण ३२० मतदानकेंद्रे आहेत, यापैकी ५ मतदानकेंद्रे ही अतिसंवेदनशील आहेत.
यावेळी दिलेल्या प्रशिक्षणावर आधारित २५ प्रश्नांची बहुपर्यायी प्रश्नपत्रिका देखील उपस्थित अधिकारी तसेच कर्मचारी यांच्याकडून सोडवून घेण्यात आली.याद्वारे किती माहिती प्रशिक्षणातुन कर्मचाऱ्यांनी घेतली याची जणू परीक्षाच प्रशासनाने घेतली.
टपाली तसेच इडिएस पद्धतीने करता येणार मतदान…
मतदानासाठी नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी हे मतदानापासून वंचित राहू नये यासाठी त्यांना टपाली मतपत्रिकेद्वारे तसेच प्रत्यक्ष मतदानकेंद्रावरच (इडिएस) पद्धतीने मतदान करता येणार आहे.शासकीय कर्मचाऱ्यांसोबतच अशासकीय कर्मचारी देखील पोस्टल मतदानाचा वापर करू शकणार आहेत.यात निवडणूक कामात कार्यरत विविध वाहनांवरील चालक,निवडणूक कामकाजासाठी असलेले छायाचित्रकार तसेच इतरांना पोस्टल मतदान बजावता येणार आहे.
दांडीबहादरांना नोटिसा…
प्रशिक्षण वर्गास अनुपस्थित असलेल्या जवळपास १०० मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना लोकप्रतिनिधीत्व अधिमियम १९५१ चे कलम १३४ अन्वये कारवाई करणेबाबत नोटिसा बजावण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
महसूल च्या ५० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिले प्रशिक्षण
निवडणूक नायब तहसीलदार प्रशांत धमके,प्रशिक्षण प्रमुख राजेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल चे ६० पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण कामी सहकार्य केले.