मतदानाविषयी जागृती निर्माण होण्यासाठी समाजोपयोगी उपक्रम…
अमळनेर:- मतदारांमध्ये मतदानाविषयी जाणीव जागृती निर्माण होण्यासाठी तसेच मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी व नेतृत्व गुण विकसित होण्यासाठी साने गुरुजी विद्यालयाने ३०० विद्यार्थ्यांना मतदार प्रबोधन दूत नेमून अभिनव उपक्रम राबवला.
साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयातील ३०० विद्यार्थ्यांची मतदार प्रबोधन दूत म्हणून निवड केली. नोडल अधिकारी डी ए धनगर यांच्या संकल्पनेने मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी विद्यार्थ्यांची निवड केली. मतदार प्रबोधन दूत म्हणून निवड झालेले विद्यार्थी आपल्या कुटुंबात व परिसरातील इतर दहा कुटुंबात जाऊन मतदान करण्याविषयी फायदे सांगतील. मतदानापूर्वी तसेच मतदानाच्या आदल्या दिवशी व मतदानाच्या दिवशी हे विद्यार्थी परिश्रम घेणार आहेत. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होणार आहे. लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी मतदानाची टक्केवारी वाढवून योग्य लोकप्रतिनिधी निवडून जावा यासाठी मतदान जाणीव जागृती करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आनंदाने हे काम स्वीकारल्याचे सांगितले. लोकशाहीचा जागर करण्यासाठी आमचाही वाटा आहे त्यामुळे आम्हाला या गोष्टीचा अभिमान असल्याची भावना सुद्धा बोलून दाखवली.
सदर अभिनव उपक्रमाचे व विद्यार्थ्यांचे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा , नायब तहसीलदार प्रशांत धमके, गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे , सर्व संचालक मंडळ, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.