कळमसरे येथील मजुराचा उपचारादरम्यान झाला मृत्यू…
अमळनेर:- तालुक्यातील कळमसरे येथील विकास उर्फ विकी पारधी (वय-३०) याचा १० रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास प्रताप महाविद्यालयाजवळील उड्डाणपूलावरून मोटारसायकल खाली कोसळून अपघात झाला होता. त्याला धुळे येथे उपचारासाठी नेले होते. मात्र रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
दिनांक १० रोजी सायंकाळी अमळनेरहुन गावाकडे येत असताना हा अपघात झाला होता. त्याला अमळनेर येथे दवाखान्यात नेले मात्र त्याची परिस्थिती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले होते. रात्री साडे तीन वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विकास हा सेंट्रिंग कारागीर होता.आणि यावरच त्याचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह देखील अवलंबून होता. विकास पारधी यांचे गाव साकरे ता. अमळनेर होते. त्याच्या आई सोबत लहानपणीच मामाच्या गावी कळमसरे येथे आई, बहीण, लहान भाऊ यांच्यासह वास्तव्यास होता. मागील दीड वर्षापूर्वी त्याचा विवाह झाला होता. त्याच्या या अपघाती मृत्यूमुळे परिवारातला कर्ता पुरुष गेल्याने परिवाराचा आधारच हरपला यामुळे त्याची आई, पत्नी, बहीण लहान भाऊ यांचे दुःख पाहून ग्रामस्थांनाही अश्रू अनावर झाले होते. दिनांक ११ रोजी दुपारी साडे तीन वाजता कळमसरे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तो प्राथमिक शिक्षक गणेश पारधी यांचा भाचा असून त्याच्या पश्चात आई, पत्नी, बहीण व भाऊ असा परिवार आहे.
Related Stories
December 22, 2024