दिग्दर्शक नागराज मंजुळे करणार ‛क्रांतीपर्व’ या चित्रपटाचे दिग्दर्शन..
अमळनेर:- स्वातंत्र्याच्या आंदोलनात देशातील सर्वात मोठे जळीत कांड घडवणारे क्रांतिकारक आणि भूमी अमळनेरची होती. हा पडद्याआड राहिलेला इतिहास ‛क्रांतीपर्व’ या चित्रपटातून उलगडण्यात येणार आहे. क्रांतिवीरांगणा लीलाताई पाटील व डॉ उत्तमराव पाटील यांच्या जीवनपटावर प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे दिगदर्शन करणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष श्याम पाटील यांनी सांगितले.
संत सखाराम महाराजांची पुण्यभूमी, प्रतिपंढरपूर, विप्रो चे मालक हाशीमजी प्रेमजी यांची उद्योगभूमी, सानेगुरुजींची कर्मभूमी, श्रीमंत प्रताप शेठ यांची दानभूमी अशी ओळख असलेल्या अमळनेरची क्रांती भूमी म्हणून असलेली ओळख पडद्याआडच राहिली. १९४२ला महात्मा गांधींना अटक झाल्यानंतर चलेजाव चळवळ पेटली. त्यावेळी सानेगुरुजींची नुकतीच कारागृहातून सुटका झाली होती. सारा महाराष्ट्र पेटला आहे, उत्तम अजून माझे अमळनेर शांत का ? असे पत्र लिहून सानेगुरुजींनी डॉ उत्तमराव पाटलांना चेतवले. उत्तमराव अज्ञातवासात असल्याने त्यांनी आंदोलनाची धुरा आपली पत्नी लीलाताई वर सोपवली. आणि लिलाताईनी ऐतिहासिक दगडी दरवाज्याबाहेर एका सभेचा ताबा घेत घणाघाती भाषण केले. अन काय अमळनेरच्या जनतेची मनेच नव्हे तर सरकारी इमारती,रेल्वे स्टेशन, पोस्ट ऑफिस, तहसील कचेरी, कलेक्टरचा टांगा, न्यायालय सारेच पेटले. क्रांतिवीरांगणा लिलाताईच्या ललकारीने देशातील सर्वात मोठे जळीत कांड अमळनेरला झाले. इंग्रजांनी त्याकाळात अमळनेरला दीड लाखाचा दंड सुनावला होता. लिलाताई गर्भवती असताना त्यांच्या पोटावर इंग्रजांच्या बंदुकीचे ठोसे पडल्याने त्यांचा गर्भपात झाला होता. कारागृहात मारहाण झाली तरी त्या डगमगल्या नव्हत्या. कारागृहातून पळून जाऊन त्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पत्री सरकारमध्ये सामील झाल्या. महिला ब्रिगेडच्या त्या प्रमुख होत्या. यासह चिमठाणे येथील खजिना लूट व इतर धगधगत्या घडामोडींवर हा चित्रपट प्रकाशझोत टाकणार आहे.
स्वराज्यरक्षक संभाजी राजेमालिका, खाशाबा जाधव, सत्यशोधक या चित्रपटांना योगदान देणारे संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड तसेच पुणे येथील प्रसिद्ध झिवा स्टुडिओचे संचालक प्रज्ञेश मोळक यांच्याशी चर्चा केल्या नंतर प्रवीण गायकवाड यांनी प्रसिद्ध दिगदर्शक नागराज मंजुळे यांच्या दिगदर्शनात हा चित्रपट तयार करण्यात येईल अशी माहिती दिली. येत्या ९ ऑगस्ट क्रांतिदिनापासून लिलाताईंच्या अमळनेर या क्रांतीभूमित चित्रपटाच्या शूटिंगचा शुभारंभ होणार आहे, असेही श्याम पाटील यांनी सांगितले. या चित्रपट व वेबसिरीजमुळे इतिहासाला उजाळा मिळणार असून नव्या पिढीला क्रांती वीरांची आणि स्वातंत्र्याच्या संघर्षमय लढ्याची ओळख होणार आहे. यातून निश्चितच मुलांमध्ये ,तरुणांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती वाढून जनजागृती होण्यास मदत होईल.