आईच्या कष्टाची जाण ठेवत कोणतीही शिकवणी न लावता गाठले यश…
अमळनेर:- येथील तांबेपुरा येथील रहिवासी शीतल पुंडलिक पवार हिने गरिबीच्या परिस्थितीवर मात करत कोणत्याच स्पर्धा परीक्षेची शिकवणी न लावता अपार मेहनत घेत पोलीस उपनिरीक्षक बनली असून एसटी संवर्गातून ती चौथी आली आहे.
शीतल लहान असताना तिच्या वडिलांनी तिला व तिच्या आईला सोडल्याने दोघी उघड्यावर आल्या होत्या. आईने माहेर गाठले मात्र आई इंदूबाईची परिस्थिती नव्हती शिक्षण नव्हते म्हणून मजुरी शिवाय पर्याय नव्हता. त्यादरम्यान तिच्या माहेरच्या मंडळीने देखील तिला दूर सारल्याने तिची परिस्थिती बिकट झाली होती. मात्र इंदूबाईने धाडस ठेवून चिमुकल्या शीतलला घेऊन उघड्या वाळूच्या ढिगाऱ्याचा आसरा घेतला. सोबत कोणी नव्हते मात्र मुक्या कुत्र्याचा तिने आधार घेतला त्याला आणि लेकीला सोबत घेऊन तिने अनेक दिवस तसेच काढले. लेकीला अंगाशी बांधून ती गडखांब, दहिवद, पातोंडा,नगाव शिवारात गवताचा चारा कापायला जायची. आणि तो चारा विकून दिवस भागवायची. हळूहळू शीतल मोठी होत गेली आईच्या कष्टाचे, मेहनतीचे संस्कार तिच्यावर पडत गेले. आपली मुलगी शिकली पाहिजे याची जिद्द बाळगत इंदूबाईने शीतलला शिकवणे सुरू केले. शीतल देखील आहे त्या परिस्थितीत शिक्षण घेऊन एम कॉम झाली. मात्र आधीची संकटे कमी होती की काय म्हणून तिच्या आईला मानेचा आणि कमरेचा त्रास होऊ लागला होता. डॉक्टरांनी अजिबात काम करू नये, आराम करावा असा सल्ला दिला होता. त्यावेळी तिची आई मोडक्या तोडक्या लोट गाडीवर भाजीपाला विकत होती. हे बंद झाले तर पुढे काय ? मात्र आपली आईचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून घराची जबाबदारी शीतलने सांभाळली आणि सेतू केंद्र तसेच खाजगी बँकेत काम करून शीतलने घर खर्च तर भागवला मात्र अभ्यासही केला. पोलीस अधिकारीच व्हायची जिद्द मनात बाळगली आणि तिने पुस्तके आणून स्वतःच अभ्यास सुरू केला. ना कोणाचे मार्गदर्शन ना कोणाची शिकवण घेत स्वतःच्या मेहनतीने २०२१ ची पोलीस उपनिरीक्षक पदाची स्पर्धा परीक्षा शीतलने उत्तीर्ण केली. यापूर्वी तिने आणखी एक स्पर्धा परीक्षा पास केली आहे. विशेष म्हणजे आधीच्या काळात तिच्याकडे मोबाईल देखील नव्हता. ती एव्हढ्यावर थांबली नसून तिची डीवायएसपी व्हायची इच्छा असून पहिली परीक्षा पास झाली आहे दुसऱ्या परीक्षेची तयारी सुरू आहे.
प्रतिक्रिया…
मला लहानपणी सीमा पाटील यांच्यामुळे अभ्यासात लळा लागला. आताच्या तरुणींनी आलेल्या परिस्थितीवर, गरिबीवर रडण्यापेक्षा लढायला शिकले पाहिजे. आपली स्वतःची इच्छा चांगल्या मार्गाकडे जाण्याची असेल तर यश हमखास येतेच हे सिद्ध झाले आहे.
– शीतल पवार, तांबेपुरा