शहरी भागातील मुख्याध्यापकांच्या आढावा सभेत दिली तंबी
अमळनेर :- बदलापूर येथील घटनेची आपल्या शाळेत पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मुख्याध्यापकांनी दक्ष राहायला हवे.विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेबाबत कोणताही निष्काळजी पणा सहन केला जाणार नसल्याची तंबी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी शहरी भागातील मुख्याध्यापकांच्या आढावा सभेत दिली.
यावेळी त्यांनी सांगितले की,राज्यात शालेय आवारात घडणाऱ्या अनुचित घटनांची संख्या वाढत असल्याने शासनाने त्यावर उपाययोजना म्हणून प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे.विद्यार्थी सुरक्षा समिती, सखी सावित्री समिती व तक्रार पेटी बसविण्याबात शासन निर्णय काढून एका महिन्याच्या आत बसविण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून त्याची आढावा बैठक नगरपालिका सभागृहात आयोजित करण्यात आली होती.यावेळी त्यांनी सांगितले की,विद्यार्थ्यांच्या सुरक्षा ही काळाची गरज असून त्याकडे कोणीही दुर्लक्ष करू नये.शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार मुख्याध्यापकांनी दिलेल्या मुदतीत कारवाई करावी.व तसा अहवाल कार्यालयात सादर करावा.शाळा आवारात येणाऱ्या प्रत्येक अनोळखी व्यक्तीची विचारपूस करावी.दिलेल्या मुदतीत सर्व समितीची स्थापना करून त्यांच्या बैठका घ्याव्यात.शासन निर्णयात दिलेल्या नियमाबाबत दुर्लक्ष करणाऱ्या शाळांवर मान्यता रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
तर शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी दीपाली पाटील यांनी शासन निर्णयानुसार त्वरित कारवाई करण्यात यावी.दिलेल्या मुदतीनंतर शाळा वर शिक्षण विभागाच्या भरारी पथकामार्फत पाहणी करण्यात येईल व दोषी आढळणाऱ्या शाळांवर मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर केला जाईल असे सांगितले.
यावेळी उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, लिपिक सुनील पाटील व सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते.