रंजाणे येथे झाड अंगावर पडून गायीचा मृत्यू, आमोदे येथे तरुण जखमी
अमळनेर:- तालुक्यात १२ रोजी झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीने ३८ गावातील ७४८ शेतकऱ्यांचे ४८४.७० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. रंजाणे येथे झाड अंगावर पडून गायीचा मृत्यू झाला आहे.
१२ रोजी सायंकाळी अचानक वादळ येऊन शहरात अनेक ठिकाणी शेड उडाले ,काही दुकानातील वस्तू ,झाडे कोलमडून नुकसान झाले. तर ग्रामीण भागात वादळाने अनेक पिके शेतातच आडवी पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
३३ टक्क्याच्यावर ज्वारी १०३ हेक्टर, बाजरी १२५.७० हेक्टर, मका ४६.८० हेक्टर, गहू १५ हेक्टर, भाजीपाला ३८.७० हेक्टर, पपई ९.६० हेक्टर, केळी ७ हेक्टर, फळबाग ३७.९० हेक्टर असा एकूण ४८४.७० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. तर ३३ टक्क्याच्या खाली ३ गावांमध्ये २३ शेतकऱ्यांचे १४.१० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
तालुक्यात धार, एकलहरे, झाडी, अंतुर्ली रंजाणे, आमोदे, तासखेडे,मुडी आदी ठिकाणी नुकसान झाले आहे.रंजाणे येथे रवींद्र ठाकूर यांची गाय मेली तर आमोदे येथे शांताराम पाटील यांच्या घराचे नुकसान होऊन त्यांच्या मुलाच्या अंगावर लोखंडी अँगल पडून जखमी झाला.
प्रतिक्रिया…
अनेक शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी झाली असून काही गुरे दगावली आहेत. या आपत्तीची तात्काळ दखल घेत महसूल, कृषी व विद्युत मंडळाला लवकरात लवकर पंचनामे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या अस्मानी संकटात राज्यसरकार व मदत व पुनर्वसन विभाग शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून लवकरात लवकर नुकसानभरपाई दिली जाईल.
– अनिल भाईदास पाटील
मंत्री, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन- महाराष्ट्र राज्य