अमळनेर पोलिसांत अज्ञाताविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील बिलखेडे येथील दत्तू पाटील यांच्या हातातील सोन्याची अंगठी लांबविल्याप्रकरणी अमळनेर पोलिसात अज्ञाताविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील बिलखेडे येथील दत्तू पाटील हे ८ मार्च रोजी अमळनेरात दवाखान्याच्या कामाला आले होते.दवाखान्याचे काम आटोपून बसस्थानकात बसले असता एका अनोळखी इसमाने दत्तू पाटील यांच्याशी ओळख केली. त्यांच्या काही नातेवाईकांची नावे सांगितल्याने दत्तू पाटील यांना ती व्यक्ती ओळखीची वाटली.दत्तू पाटील यांच्या हातातील सोन्याच्या अंगठीसारखी अंगठी बनवायची असल्याने आपण सोनाराकडे जाऊ असे त्याने सांगितले. एका रिक्षात बसून दोघे सोनाराकडे जात असतांना त्या अनोळखी इसमाने दत्तू पाटील यांच्या हातातील अंगठीचे माप बरोबर बसते का ? म्हणून स्वतःच्या बोटात घालण्यासाठी मागितली. अंगठी बोटात टाकल्यावर बाजारात एके ठिकाणी रिक्षा थांबवून मला फळे घ्यायची आहेत असे सांगून तो अनोळखी व्यक्ती उतरला,खूप वेळ झाल्यावर देखील ती व्यक्ती परत न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे दत्तू पाटील यांना समजले मात्र त्यांनी तक्रार दाखल केली नाही.
अशीच एक घटना एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील वरणगाव येथे घडल्याची बातमी त्यांनी वर्तमानपत्रात पहिली व त्यात त्याच संशयितांचा फोटो पाहिल्याने त्यांनी १९ रोजी अमळनेर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास हेकॉ संतोष पवार करत आहेत.