आगामी यात्रोत्सव व निवडणुकांच्या दृष्टीने निर्णय, नपला भरावे लागणार ५० लाख…
अमळनेर:- शहराच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी हतनुर धरणातून ५.५ दशलक्ष घनमीटर पाण्याचे आवर्तन सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याना दिले आहेत. यासाठी नगरपरिषदेला ५० लाख रुपये भरावे लागणार आहेत. सुरुवातीला तातडीने २५ लाख रुपये भरावे लागणार आहेत.
अमळनेर शहरात सध्या तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. सहा ते सात दिवसांनंतर पाणी मिळत आहे. त्यात कलाली येथे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणी पुरवठ्यात अडचणी निर्माण होत आहेत. अमळनेर शहराला दररोज १कोटी ४० लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र जळोद डोहावर फक्त ३४० अश्वशक्ती चा एक पंप तासाला ४ लाख लिटर पाणी उचलतो. तर कलाली येथून तासाला २ लाख ४० हजार लिटर पाणी उचलले जाते. म्हणून आगामी यात्रोत्सव, निवडणुका आदी बाबी पाहता मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी हतनुर धरणातून आवर्तन घेण्याचा निर्णय घेतला. जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवल्यानंतर त्याला मंजुरी देण्यात आली आहे.
हतनुर धरणापासून तापी नदीवरील जळोदचा डोह १२० किमी आहे. हतनुर धरणावरून पाणी सोडल्यास ८० किमी अंतर कालव्यातून आणि त्यांनतर रत्नावती नदीतून गंगापुरी जळोद डोहापर्यंत येण्यासाठी चार दिवस लागतील.