वाडी संस्थान परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी…
अमळनेर:- खान्देशातील शेवटची यात्रा असणाऱ्या संत सखाराम महाराज यात्रोत्सव निमित्त दि.१९ रोजी रात्री ८ वाजता वाडी संस्थानातून रथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ठरविलेल्या मार्गानुसार पूर्ण रात्रभर मिरवणूक चालून पहाटे संस्थानात दाखल होईल.यावेळी वाडी संस्थान परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
अमळनेर येथील संत सखाराम महाराज यात्रोत्सव निमित्त लालजींच्या रथाची भव्य मिरवणूक रात्री ८वाजेच्या सुमारास काढण्यात आली.वाडी संस्थानातून निघालेला रथ पानखिडकी,सराफ बाजार,बोरी नदीतून पैलाड, मातंगवाडा, कसाली मोहल्ला मार्गे पहाटे परत वाडी संस्थानात पोहचतो.
सायंकाळी साडेसात वाजता जयदेव व सख्याहरी यांनी विधिवत पूजा केली. त्यानंतर रथाची पूजा करून विधिवतपणे मूर्त्या विराजमान करण्यात आल्या. रथावर बसण्याचा मान ब्रम्हे व वैद्य पुजारी यांना मिळाला. भेर व तुतारीच्या निनादात सवाद्य संस्थानातील मंदिराजवळून रात्री ८ वाजेच्या सुमारास रथाची मिरवणुकीस सुरुवात झाली. रथाच्या पुढे भगवे ध्वजधारक दोन घोडेस्वार होते. त्यांच्यापाठोपाठ वारकरी व नगारे होते. सोबतच अब्दागिरी-धारक सेवेकरी व मशाल-धारी सेवेकरी होते. लेझीम मंडळाचे जल्लोषपूर्ण नृत्य, रथाच्या मागे लहान गाड्यावर महाराजांच्या चांदीच्या पादुका व मुखवटा ठेवला होता. रस्त्यावर दुतर्फा भाविकांना श्रीफळ, केळी, खडीसाखरेचा प्रसाद देण्यात आला. रस्त्यावर ठिकठिकाणी प्रसाद महाराजांसह रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. ठिकठिकाणी आरत्याही झाल्या.
रथ उत्सवामुळे आज सायंकाळी वाडी परिसर गजबजले होते. सायंकाळी शहर व ग्रामीण भागातील वारकरी संप्रदायाच्या भाविकांनी हजर राहून लालजींचे दर्शन घेतले.
यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी, माजी विधान परिषद सदस्या स्मिता वाघ,अनिल शिंदे, हरी भिका वाणी,प्रभाकर कोठावदे, मुख्याधिकारी,तुषार नेरकर, पंकज चौधरी,बबली पाठक,शितल देशमुख,निलेश भांडारकर, डॉ.चंद्रकांत पाटील, पोलिस निरीक्षक विकास देवरे यांच्या सह प्रशासकीय अधिकारी, पोलीस दलाचे अधिकारी उपस्थित होते.