अमळनेर पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल…
अमळनेर:- गेल्या तीन महिन्यात शहरातील विविध भागातून बीएसएनएल कंपनीच्या तांब्याच्या तारा चोरीस गेल्याच्या सहा घटना घडल्या. उशिराने अमळनेर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२१ फेब्रुवारी रोजी वाडी चौकातील फोन बंद असल्याच्या तक्रारी आल्यानंतर अभियंता पंकज रायसिंघानी यांनी पाहणी केली असता २०० मीटर तांब्याची पाच पेअर केबल चोरीस गेल्याचे आढळून आले. २२ रोजी सराफ बाजारात व्ही व्ही गुजराथी यांच्या छतावरील २०० मीटर केबल चोरीस गेल्याचे उघडकीस आले. २६ रोजी कसाली मोहल्ल्यात देखील काही जण केबल कापून नेत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये आढळून आले. तर ३ मार्च रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास पंजाब नॅशनल बँकेजवळ रस्त्याच्या कामालगत असलेली केबल एक अज्ञात महिला कापून चोरून नेत असल्याचे गजानन स्टील सेंटरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आले.तर ९ ते १० मे दरम्यान बाजार समितीत जे डी सी सी बँकेसाठी असलेली केबल चोरीस गेल्याचे उघडकीस आले. एकूण ३५ हजाराची केबल चोरीस गेल्याची फिर्याद पंकज रायसिंघानी यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत.