इतर विकासोमार्फत कर्ज वितरण झाल्याने शेतकऱ्यांत निर्माण झाली विषमता…
अमळनेर:- अनिष्ट तफावतीतील विका सोसायटीच्या सभासदांना अद्यापही कर्ज वाटपास विलंब होत आहे तर दुसरीकडे मात्र विका सोसायटीमार्फत ८० टक्के पीक कर्ज वाटप झाल्याने शेतकऱ्यांच्या शेती मशागतीत कृत्रिम विषमता निर्माण झाली आहे.
अनिष्ट तफावतीत गेलेल्या विविध कार्यकारी सोसायट्याकडून पीक कर्ज वाटप अधिकार काढून ते जिल्हा मध्यवर्ती बँकेने स्वतःकडे घेतले आहेत. अमळनेर तालुक्यात अशा १४ संस्था असून अशा संस्थांच्या सभासद शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी बँकेचा भला मोठा अर्ज, त्यावर जामीनदार सह्या व इतर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत. पीक कर्ज वाटप सुरू करून महिना उलटला तरी देखील अनिष्ट तफावतीतील सोसायटीच्या शेतकऱ्यांना अद्यापही कर्ज वाटप झालेले नाही. दुसरीकडे मात्र इतर विका सोसायटीच्या शेतकऱ्यांना मात्र कर्ज वाटप सुरू झाले असून ८० टक्के वाटप झाल्याने त्या शेतकऱ्यांचे बियाणे खरेदी, मशागत, खते खरेदी सुरू झाली आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नाही त्यांची कामे केव्हा सुरू होतील, वेळेवर पेरणी होईल का ही अडचण आहे.
जिल्हा बँकेने निम्मे कर्ज रोखीने देण्याचा ठराव केला असला तरी शेतकऱ्यांना बँकेकडून बँकेच्याच मायक्रो एटीएमने पैसे दिले जात आहेत. त्यात २५ हजार रुपयांसाठी २० रुपये जादा फी मोजावी लागते आहे. एका वेळी फक्त ७५ हजार रुपये मिळू शकतात.
प्रतिक्रिया…
अमळनेर तालुक्यात अनिष्ट तफावतीच्या सोसायटीच्या २२०० शेतकऱ्यांना जिल्हा बँकेतर्फे कर्ज वाटप करायचे आहे. मात्र १२०० शेतकऱ्यांनीच अर्ज भरले आहेत. ते जिल्हा शाखेकडे रवाना करण्यात आले आहेत. मंजुरी आल्यावर कर्ज वाटप केले जाईल.
–अनिल अहिरराव, उपविभागीय व्यवस्थापक, अमळनेर
प्रतिक्रिया…
बाजार समितीच्या शाखेकडे ३५ विका सोसायट्या आहेत. ८० टक्के कर्ज १८ कोटी रुपये वाटप झाले आहे. आणि जिल्हा बँकेच्या धोरणानुसारच मायक्रो एटीएम चे २० रुपये चार्ज लावले जात आहेत. – सागर पाटील, शाखा व्यवस्थापक, बाजार समिती शाखा अमळनेर