संस्थाचालकाने बेकायदेशीर ८७ लाख रुपये अनुदान लाटल्याचा गटशिक्षणाधिकारींनी केला आरोप…
अमळनेर:-शाळेची बदनामी करून धमकी दिली,तसेच आरटीइ प्रवेशातून ५ % दराने पैसे मागितल्या प्रकरणी अमळनेरचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील यांच्याविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
तालुक्यातील जवखेडे येथील दत्तगुरू इंग्लिश मीडियम स्कूलचे लिपिक उमेश राजेंद्र पाटील यांनी मंगळवारी याबाबत फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले आहे की, रावसाहेब पाटील यांनी १८ एप्रिल २०२४ रोजी एका व्हाट्सअप ग्रुपवर शाळेबद्दल बदनामीकारक मजकूर टाकला होता. त्याबाबत उमेश पाटील यांनी पंचायत समितीकडे २७ मे रोजी अर्ज केला होता. त्याची नक्कल घेण्यासाठी २८ मे रोजी सकाळी फिर्यादी उमेश पाटील, रवींद्र पाटील, गोकूळ पाटील हे पंचायत समितीतील आवक-जावक विभागात गेले होते. त्यानंतर संबंधितांनी रावसाहेब पाटील यांची भेट घेत त्यांना शाळेची बदनामी करू नका, अशी विनंती केली. त्यावर पाटील यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
प्रतिक्रिया…
संस्थाचालकाविरुद्ध यापूर्वी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संस्था चालकाने आरटीई कायद्यानुसार बेकायदेशीर ८७ लाख रुपये अनुदान लाटले आहे त्याची कारवाई सुरू आहे म्हणून दडपण टाकण्यासाठी खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला आहे.- रावसाहेब पाटील, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती अमळनेर