उलट गटशिक्षणाधिकारींनी पाच टक्के लाच मागितल्याचा केला आरोप…
अमळनेर:- आरटीई अंतर्गत आमच्या संस्थेने नियमानुसार हक्काची रक्कम घेतली असून आम्ही कोणताही अपहार केलेला नाही,याची खुशाल चौकशी करावी,आम्ही दोषी आढळल्यास संपूर्ण रक्कम शासनाकडे परत भरणार असे जवखेडा येथील दत्तगुरु इंग्लिश मिडीयम स्कुलचे ऍड योगेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
तसेच उलट गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी सदर अनुदानासाठी 5 टक्के लाच मगितल्याचा आरोप यावेळी केला.संस्थेच्या वतीने अधिक खुलासा करण्यासाठी काल सायंकाळी 6 वाजता श्री दत्त गुरू इंग्लिश मिडीयम स्कुल शाळेचे संस्थाचालक ऍड योगेश पाटील आणि भटू पाटील यांनी जुना टाऊन हॉल येथे पत्रकार परिषद घेतली, यावेळी भटू पाटील यांनी गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी आलेल्या अनुदानावर व आर टी ई रकमेवर 5 टक्के इतकी लाच मागितल्याचे सांगितले, तर ऍड योगेश पाटील यांनी गटशिक्षणाधिकारी यांनी चौकशी करावी, दोषी आढळलो तर सर्व रक्कम एकरकमी भरेल मात्र त्यांनी संस्थेची बदनामी केली, त्यामुळे त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले. याबाबत अधिक बोलताना ते म्हणाले की, आमच्या शाळेला अधिकृत मान्यता असून संपूर्ण परिवाराच्या मेहनतीने शाळा उभी राहिली आहे,आरटीई प्रमाणे आम्ही गरिबांची मुले शिकविल्याने आमचा हक्क म्हणून आम्ही अनुदान घेतले आहे.कुणी टक्केवारी मागत असेल तर ती कशी देणार?चळवळीतुन आम्ही शाळा सुरू केली असून जो वाकडी नजर करेल त्याला कायदेशीर सोडणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला.