गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला आरोप…
अमळनेर:- जवखेड्यातील दत्तगुरू इंग्लिश मिडीयम स्कुलचे संस्थाचालकाने 87 लाखांचे ज्यादा अनुदान लाटल्याचे आपण उघड केल्यानेच आपल्यावर खोटा गुन्हा झाला असल्याचा आरोप गटशिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
अमळनेर येथील गटशिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील यांच्याविरुद्ध मंगळवारी तालुक्यातील जवखेडे येथील दत्तगुरू इंग्लिश मीडियम स्कूलचे लिपिक उमेश राजेंद्र पाटील यांनी टक्केवारी मागितल्याचा गुन्हा दाखल केल्यानंतर रावसाहेब पाटील यांनी काल गुरुवारी सायंकाळी शिक्षण विभागात पत्रकार परिषद घेत, सदर संस्था चालकांनी आरटीई अंतर्गत विद्यार्थी प्रवेशाचे जास्तीचे अनुदान कसे घेतले, याबाबतचे कागदपत्रे सादर केले त्यावरून या संस्थेनं 87 लाख 23 हजार 904 रुपयांचे ज्यादा अनुदान घेतल्याचे सांगत हा अपहार असल्याने आणि ते उघडकीस येऊ नये हा त्यांचा प्रयत्न असल्याने यामुळेच आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.यात अधिकारी देखील सहभागी असण्याची शक्यता असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच शासनाची ही मोठी फसवणूक असुन त्यांचा भाऊ वकील असल्याने अधिकारी वर्गावर दबाव टाकून हे अनुदान लाटले गेले आहे. तसेच आपण वरिष्ठांकडे याबाबत अहवाल पाठवून हा अपहार झाल्याचे निदर्शनास आणून दिले असून अधिकारी व शासनाने लक्ष घालून कारवाई न केल्यास उच्च न्यायालयात वसुलीसाठी दावा दाखल करणार असल्याचे रावसाहेब पाटील यांनी सांगितले.