अमळनेर:- यंदाची जळगांव लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीचा अंदाज भल्या भल्यांना लावता येत नव्हता, अनेकांच्या मते अटीतटीची लढत होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता, मात्र त्या सर्वांना चुकीचे ठरवत भाजपच्या उमेदवार स्मिता वाघांनी अडीच लाखांचा लीड घेत मविआच्या करण पवारांना मात दिली.
मतमोजणीत स्मिता वाघांनी सुरुवातीपासून घेतलेला लीड शेवटपर्यंत वाढत गेला. प्रत्येक विधानसभा मतदार संघात त्यांना करण पवार यांच्यापेक्षा जास्तीचे मतदान मिळाले. अमळनेर विधानसभा मतदार संघात स्मिता वाघ यांना ११५४२८, तर करण पवार यांना ४४२३५८ इतके मतदान मिळाले.
भाजपचा बालेकिल्ला, पक्षनिष्ठा व मतदारांच्या सहानुभूतीमुळे मोठा विजय…
जळगाव लोकसभा मतदारसंघ हा आधीपासून भाजपचा बालेकिल्ला असून स्मिता वाघ यांनी मागील वेळी तिकीट नाकारून ही नाराजी न दर्शवता पक्षकार्यात झोकून दिल्याने निष्ठेचे हे फळ मिळाल्याचे बोलले जात आहे. स्व. उदय बापूंच्या निधनानंतर स्मिता वाघांना बाजूला केले जाते की काय अशी परिस्थिती एकवेळ निर्माण झाली होती. अनेकांनी त्यांच्यापासून दूर होत दुसऱ्या नेत्यांची शरण घेतली होती. मात्र लेट पण थेट ह्या उक्तीप्रमाणे लोकसभेचे तिकीट मिळाल्याने त्यांनी प्रचारात पूर्णपणे झोकून दिले. त्यांना तालुक्यातून मोठी सहानुभूतीही असल्याने त्याचा मोठा फायदा झाला. होम ग्राउंडवर मंत्री अनिल पाटील यांनी भक्कम बाजू सांभाळल्याने वाघांना इतर तालुक्यांत प्रचाराला मोठा वेळ देता आला. तालुक्यातून मोठा लीड मिळवून दिल्याने मंत्री अनिल पाटील यांनी स्व. उदय बापूंच्या उपकाराची परतफेड केल्याचे बोलले जात आहे. ह्या निकालाने तालुक्याच्या राजकारणाची दिशा आणि दशा बदलली असून चार महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मंत्री अनिल पाटील यांची बाजू ही भक्कम झाली आहे.
अडीच लाख मतांनी मात दिल्याने अनेकांचे अंदाज चुकले…
राज्यात महाविकास आघाडीने आगेकूच केली असताना जळगांव मतदारसंघाने भाजपवर विश्वास कायम ठेवला आहे. यंदाच्या निवडणुकीत मात्र कोण विजयी होणार आणि किती मतांनी होणार याचे आराखडे कोणालाच बांधता येत नव्हते. अनेक राजकीय पंडित स्मिता वाघ बाजी मारतील मात्र लढत अटीतटीची होईल असा अंदाज बांधत होते. मात्र सर्वांचा अंदाज चुकवत स्मिता वाघांनी अडीच लाखांचा लीड घेत विजय मिळवल्याने अनेकांना आश्चर्य वाटले.
खासदार स्मिता वाघांना केंद्रीय मंत्रिपद ???
उत्तर महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर या पाच जिल्ह्यात भाजपाचे फक्त दोन खासदार निवडून आले असून राज्यात महाविकास आघाडीची हवा असताना देखील स्मिता वाघ अडीच लाखांच्या मोठ्या फरकाने विजयी झाल्या. भाजप सत्तेत आल्यास स्मिता वाघ यांना केंद्रीय मंत्री पद मिळण्याची शक्यता असून स्मिता वाघ मराठा समाजाच्या असून मंत्रीपद दिल्यास पक्षाची ताकद वाढेल. तसेच जिल्ह्यातील दुसऱ्या खासदार रक्षा खडसेंना मंत्रिपद दिल्यास अप्रत्यक्ष त्यांचे सासरे एकनाथ खडसेंचीच ताकद वाढेल, त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळू नये यासाठी जिल्ह्यातूनच प्रयत्न होतील. त्यामुळे अमळनेर तालुक्याला आता केंद्रीय मंत्रिपदाचा मान मिळेल अशी शक्यता कालच्या विजयाने निर्माण झाली आहे.