सेवानिवृत्तीला वृक्षारोपण करून दिला पर्यावरण बचावचा संदेश…
अमळनेर:- एखाद्या व्यक्तीच्या कार्याची छाप ही सेवा निवृत्ती झाल्यानंतर देखील कायम असते, याची प्रत्यक्ष अनुभूती येथील शिक्षक सहकाऱ्यांना आली आहे. अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य संजय उत्तम पाटील उर्फ एस यु पाटील हे 31 मे रोजी निवृत्त झाले. शेवटच्या दिवशी सहकाऱ्यांनी दिलेल्या अनोख्या निरोपाने सर्वांचेच लक्ष वेधले गेले. सेवानिवृत्तीच्या दिवशी शालेय परिसरात वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने पर्यावरणाचा अनोखा संदेशही त्यांनी आपल्या कृतीतून दिला आहे. विशेष म्हणजे आपल्या शिक्षक सहकाऱ्यांकडून झालेला फुलांचा वर्षाव, ढोलताशांचा गजर, संगीताची साथ देत एका ‘दबंग आणि जिगरबाज’ प्राचार्याचा निरोप समारंभ हा चर्चेचा विषय ठरला आहे.
शासकीय- निमशासकीय सेवेत रुजू होणे अन वयोमानानुसार सेवा निवृत्ती होणे हे अटळ सत्य असते. शिक्षणाच्या या पवित्र प्रवाहात त्या व्यक्तीने केलेले प्रशासन, राबविलेल्या उत्तमोत्तम अभिनव योजना, कार्यशैली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या सहकाऱ्यांना व विद्यार्थ्यांना दिलेली वागणूक या गोष्टीचे नेहमीच मोजमाप होते. पाटील यांनी छत्रपती संभाजी नगर येथील संत मीरा माध्यमिक विद्यालयात 13 जून 1994 रोजी शिक्षक म्हणून कामाला सुरुवात केली. अल्पावधीतच आपल्या अध्यापन कार्याने ते विद्यार्थी प्रिय शिक्षक झाले. त्यांची कार्यक्षमता ओळखून संस्थेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी 1 ऑगस्ट 2006 रोजी अमळनेर येथील विजय नाना पाटील आर्मी स्कूल येथे प्राचार्य म्हणून नियुक्त केले. त्यानंतर त्यांनी रवंजे येथील गौरीशंकर माध्यमिक विद्यालय, माळशेवगे येथील माध्यमिक विद्यालय तसेच छत्रपती संभाजी नगर येथील संत मीरा माध्यमिक विद्यालयात प्राचार्य म्हणून काम पाहिले. त्यांच्या 30 वर्षाच्या सेवा काळात अनेक विद्यार्थी मोठमोठ्या पदांवर रुजू झाले आहेत. आयएएस अधिकारी सुमित महाजन, आर टी ओ स्वप्नील वानखेडे यांच्यासारखे अनेक माजी विद्यार्थी हे प्रशासनात अधिकारी म्हणून काम करीत आहेत. अनेक माजी विद्यार्थी संशोधक, डॉक्टर्स, इंजिनिअर, युवा उद्योजक होऊन समाजाची सेवा करीत आहे. सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दिवशी दिलेल्या अनोख्या निरोपाने संजय पाटील हे भावुक झाले होते. त्यांनी प्राचार्याच्या खुर्चीची पूजा करून पुष्पहार अर्पण केला अन आपली कृतज्ञता व्यक्त केली. कामाच्या ठिकाणी दिला जाणारा निरोपाचा सन्मान सोहळा हे तुमच्या केलेल्या कामाची पोचपावती असते. अशाप्रकारे जाहीर निरोप देण्याचा कार्यक्रम अमळनेर तालुक्यात प्रथमच झाला आहे.
सहआयुक्त यांच्या हस्ते सन्मान….
श्री. मंगळ ग्रह मंदिरात झालेल्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यात आदिवासी विकास विभागाचे सह आयुक्त कपिल पवार, जळगाव जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार यांच्या हस्ते आर्मी स्कूलचे प्राचार्य संजय पाटील व भारती पाटील या दांपत्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे मानद शिक्षण संचालक प्रा. सुनील गरुड अध्यक्षस्थानी होते. मंगळ ग्रह सेवा संस्थांनचे अध्यक्ष डॉ डिगंबर महाले, शिक्षक क्रांतीचे अध्यक्ष मनोज पाटील, राज्य शिक्षकेतर महासंघाचे अध्यक्ष वाल्मीक सुराशे, जिल्हा शिक्षकेतर संघाचे अध्यक्ष आसाराम शेळके, निवृत्त प्राचार्य सुरेश साळुंखे, सुभेदार मेजर नागराज पाटील, निवृत्त मुख्याध्यापक एस डी देशमुख, निवृत्त मुख्याध्यापक पी.सी. ठाकरे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.आयएएस अधिकारी सुमित महाजन यांनी ऑनलाईन मनोगत तर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केले. उमेश काटे यांनी सूत्रसंचालन केले. आर्मी स्कुलचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.