वाळू वाहतुकदाराने एकाच्या डोक्यात मारली पावडी…
अमळनेर:- बोरी नदीतून वाळू चोरू नका म्हणून सांगण्याचा राग आल्याने वाळू चोरट्याने एकाच्या डोक्यात पावडी मारून जखमी केल्याची घटना ४ रोजी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास कन्हेरे येथे घडली.
प्रमोद चव्हाण हा श्रावण मोतीलाल पारधी यांच्यासोबत ४ रोजी कन्हेरे येथे बोरी नदीतून जात असताना सुरेश मुकुंदा गोलाईत हा नदीतून पॅजो रिक्षामध्ये वाळू भरत होता. त्याला प्रमोद चव्हाण याने वाळू भरू नको म्हणून सांगितले असता सुरेश याला राग आला आणि त्यांनी नदी तुझ्या बापाची आहे का असे म्हणत शिवीगाळ सुरू केली. आणि त्याचा भाऊ सागर गोलाईत याला फोन लावून बोलावून घेतले. सागर देखील आल्या आल्या शिवीगाळ करू लागला. तेवढ्यात सुरेश याने पावडीच्या लाकडी दांडक्याने डोक्यात मारल्याने प्रमोद जखमी झाला. डोक्यातून रक्त वाहू लागल्याने त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या डोक्याला चार टाके पडले. त्याला चक्कर येत असल्याने त्याने उशिरा फिर्याद दिल्याने अमळनेर पोलीस स्टेशनला दोघा भावाविरुद्ध भादवि ३२४,३२३ ,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.