अमळनेर :- तालुक्यातील मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत दिनांक. 22 सप्टेंबर रोजी मारवड गावात विविध सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करण्यात आली.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सतिश पारधी व महिला सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.नंदा कंधारे यांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. मारवड गावातील हनुमान मंदिर परिसरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियान राबवले. मंदिर परिसरातील स्वच्छता झाल्यानंतर बस स्थानक परिसरात विद्यार्थ्यांनी केरकचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली.
शहीद जवान पुतळ्याजवळ स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियान राबवून तेथील केरकचरा गोळा केला. मारवड ग्रामपंचायत परिसर देखील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी झाडून तेथील केरकचरा गोळा केला. नंतर मारवड पोलीस स्टेशन परिसर देखील स्वच्छ करण्यात आला. गावातील विविध चौकात देखील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत स्वच्छता अभियान राबवले.
स्वच्छता ही सेवा उपक्रम यशस्वी राबवण्यासाठी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सतिश पारधी व महिला सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नंदा कंधारे यांनी परिश्रम घेतले. मारवड गावातील विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या अनेक स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदविला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी सदर उपक्रमासाठी अनमोल असे मार्गदर्शन केले.