तीन गुरे व वाहनासह ३ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड कडून अमळनेरकडे एका पिकअप वाहनातून तीन गुरे बेकायदेशीररित्या दाटीवाटीने वाहतूक करून नेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडून गुरांसह वाहन ३ लाख ३२ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
१० जून रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास मारवड हुन अमळनेर कडे एक गुरे कोंबलेले वाहन येत असल्याची माहिती अमोल पाटील यांना मिळताच त्यांनी ही घटना पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना कळवली. त्यांनी रात्रीच्या गस्तीवर असलेल्या अमोल पाटील,जितेंद्र निकुंभे, गणेश पाटील, सिद्धांत शिसोदे याना मारवड रस्त्यावर उड्डाण पुलाजवळ पाठवले. आठ वाजून वीस मिनिटांनी पिकअप वाहन क्रमांक एमएच १८ एए ४७५३ येताना दिसल्याने पोलिसांनी वाहन अडवले असता त्यात तीन गुरे निर्दयीपणे पाय बांधून कोंडलेल्या अवस्थेत दिसून आले. चालकाला नाव व परवाना विचारले असता चालकाने त्याचे नाव सुनील दशरथ मोकळे (वय ४७ रा पवननगर, चाळीसगाव रोड धुळे) असे सांगितले आणि त्यांच्याकडे कोणताच पुरावा नसल्याचेही सांगितले. ही गुरे किरण बापू चौधरी व भूषण बापू चौधरी (दोन्ही रा पवननगर चाळीसगाव रोड धुळे) यांच्या मालकीची असल्याचे सांगितले. पोलिसांनी प्रत्येकी १० हजार रुपये किमतीचे दोन बैल व १२ हजार रुपये किमतीचा एक बैल असे एकूण ३२ हजाराचे बैल , तसेच तीन लाख रुपये किमतीचे वाहन जप्त करून सुनील मोकळे, किरण चौधरी,भूषण चौधरी यांच्याविरुद्ध प्राण्यांची क्रूरतेची वागणूक प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११ (१)(ड)(ई)(फ)(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत.