
अमळनेर:- तालुक्यातील विविध खाजगी तसेच जिल्हा परिषद शाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.

मारवड येथे जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळेत प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, अध्यक्ष विजया साळुंखे, सार्वजनिक वाचनालय अध्यक्ष हरिभाऊ मारवडकर, कैलास कुंभार, अशोक कोळी, पालक विद्यार्थी उपस्थित होते. प्रथमतः इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. शालेय सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शालेय पोषण अंतर्गत गोड जेवण देण्यात आले.
साने गुरुजी विद्यालयात गुणवंतांचा गौरव व नवागतांचे स्वागत…
साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय व साने गुरुजी कन्या विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने एसएससी मार्च 2024 परीक्षेत 90% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा पालकांसह गौरव करण्यात आला. तसेच नवीन प्रवेश घेतलेल्या नवागतांचे स्वागत इयत्ता आठवीची पाठ्यपुस्तके व गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्था सचिव संदीप घोरपडे होते. यावेळी मुख्याध्यापक सुनिल पाटील, मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे, सहसचिव ॲड. अशोक बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक गुणवंतराव पाटील, भास्करराव बोरसे, किरण पाटील, शिक्षण तज्ञ गोकुळ बोरसे, हिम्मतराव पाटील, इंजिनीयर विजय बाविस्कर, शिक्षक प्रतिनिधी विलास चौधरी उपस्थित होते. विद्यार्थी मनोगत नयन पाटील व प्रांजल कुसुंबे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष उघडे व जे.एस.पाटील तर आभार प्रदर्शन डी.ए.धनगर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
सरस्वती विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांचे मनोरंजक पद्धतीने स्वागत…
शहरातील सरस्वती विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांचे पारंपारिक, मनोरंजक पद्धतीने स्वागत करून पुस्तके व मिष्ठांन्न देऊन विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस गोड करण्यात आला.
विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करीत सरस्वती विद्या मंदिर येथील विद्यार्थ्यांचे पारंपारिक पद्धतीने शिक्षिका संगीता पाटील, गीतांजली पाटील यांनी औक्षण केले. यावेळी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक रणजित शिंदे यांच्या हस्ते गुलाब पुष्प व पुस्तक वाटप करण्यात आले. उपशिक्षक आनंदा पाटील, ऋषिकेश महाळपूरकर यांनी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे हस्ते रांगोळीत अक्षर गिरवून शालेय शिक्षणाचा शुभारंभ करून घेतला. उपशिक्षक धर्मा धनगर यांनी प्रथम दिवसाची आठवण म्हणून विद्यार्थ्यांचे “शाळेचा पहिला दिवस सेल्फी पॉइंट फ्रेम” मध्ये सेल्फी काढून घेतले.
शाळेच्या पहिल्याच दिवशी उपशिक्षिका पूनम पाटील व शितल पाटील यांनी फुलपाखरुंच्या आकारात नव विद्यार्थ्यांच्या हातांचे लाल व पिवळ्या रंगात कार्डशिट पेपर वर ठसे उमटवून प्रवेशोत्सवाची आगळीवेगळी आठवण जतन करून घेतली. विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या आहारासोबत मिष्ठांन्न देऊन विद्यार्थ्यांचा पहिला दिवस गोड करण्यात आला. यावेळी शालेय परिसरात विद्यार्थ्यांच्या स्वागताच्या रांगोळ्या टाकण्यात आल्या होत्या. तर परिसरात ठिकठिकाणी विविधरंगी फुगे टांगून शालेय वातावरण उत्साहवर्धक व आनंदी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक वृंद व गजानन पाटील यांनी सहकार्य केले.

