नगाव येथे गावकऱ्यांनी सेवनिवृत्तीनंतर काढली भव्य मिरवणूक
अमळनेर:- नोकरीला लागताच बॉम्ब हल्ला झाला त्यात बॉम्बचे तुकडे डोळ्याला लागून जखमी झाले. दोनदा हृदयविकाराचा झटका आला तरी देशसेवा न सोडणाऱ्या तालुक्यातील नगाव येथील नायब सुभेदाराची सेवनिवृत्तीनंतर गावाने भव्य मिरवणूक काढली.
दत्तात्रय रतन वारुळे (रा नगाव ता अमळनेर) हे ३१ मार्च १९९२ ला सैन्यदलात भरती झाले. खरेतर दत्तात्रय वारुळे अत्यंत गरीब होते. देशसेवा करण्यासाठी सैन्यदलात जाण्याची इच्छा होती. मात्र भाड्याला देखील पैसे नव्हते. त्यावेळी त्यांचे मित्र सजन हिम्मत पाटील यांनी त्यांना मदतीचा हात पुढे केला. पैसे उसने दिले. ते सैन्यात भरती झाले. गुहाटी ,जम्मू काश्मीर, आसाम, पश्चिम बंगाल, पंजाब, हैद्राबाद, तेलंगणा, जामनगर, जबलपूर, पुलगाव, लोणावळा, पुणे, गोवा आदी ठिकाणी त्यांनी तब्बल ३२ वर्षे सेवा केली.
जम्मू काश्मीर मध्ये सुरुवातीला अतिरेक्यांच्या बॉम्ब हल्ल्यात बॉम्बचे तुकडे त्यांच्या अंगावर पडले. त्यातून ते बचावले. मात्र न डगमगता देशसेवा करत राहिले. २०२२ मध्ये दोनदा हृदय विकाराचा झटका आला. मात्र तरीही बॉण्ड वाढवून ते देशसेवा करीत राहिले. नुकतेच सेवनिवृत्त झाल्याने गावकऱ्यांनी व खान्देश सुरक्षा रक्षकांच्या वतीने त्यांची सपत्नीक खुल्या जीपवर भव्य मिरवणूक काढण्यात आली. डीजेवर देशभक्ती गीतांचा सूर वाजत असल्याने साऱ्यांच्या अंगात देशभक्ती संचारली होती. संपूर्ण गावातून मिरवणुकीत महिलांनी त्यांचे औक्षण केले. सायंकाळी हभप गजानन महाराज सोनटक्के यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.