प्रधानमंत्री पोषण योजनेचे राज्य समन्वय अधिकारी देविदास कुलाळ यांची माहिती…
अमळनेर:- शाळांनी ठरवून दिलेल्या पाककृतीनुसार पात्र विद्यार्थ्यांना पोषण आहार देऊन त्याची दररोज एमडीएम पोर्टलवर नोंद करायची आहे. पोषण आहार देऊनही जर एमडीएम पोर्टलवर नोंद करण्यात आली नाही तर त्यास गटशिक्षणाधिकारी , शिक्षणाधिकारी आणि प्रशासन अधिकारी व्यक्तिशः जबाबदार राहतील. व त्यांच्यावर व्यक्तिशः कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रधानमंत्री पोषण योजनेचे राज्याचे समन्वय अधिकारी देविदास कुलाळ यांनी पत्रकाद्वारे सर्व शिक्षणाधिकारीना दिला आहे.
नवीन शैक्षणिक वर्षात योजनेस पात्र सर्व शाळांमध्ये परसबाग निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याकरिता प्रगतिशील शेतकरी, पालक, विद्यार्थी, स्वयंपाकी, मदतनीस, शाळा व्यवस्थापन समिती यांची मदत घ्यावी. तसेच दर तिमाही विद्यार्थ्यांची वजन व उंची यांची नोंद करून आरोग्य विभागाशी संपर्क करून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी. विद्यार्थ्यांना जंतनाशक, आयर्न व फॉलिक ऍसिड गोळ्या देण्यात याव्यात.
जिल्हा व तालुक्यातील अधिकाऱ्यांनी दररोज लिंक वर जाऊन शाळांनी पोषण आहार दिला की नाही याची खात्री करून घ्यावी. शाळा माहिती देण्यास प्रलंबित असतील तर त्यांची त्याच दिवशी एमडीएम पोर्टलवर नोंद घेण्यात येईल.
स्वयंपाक गृह, भांडी,तांदूळ स्वच्छ असला पाहिजे मुलांना आहार स्वच्छतापूर्ण आणि आरोग्यपूर्ण वातावरणात दिला पाहिजे असेही पत्रकात म्हटले आहे. दररोज एमडीएम पोर्टलवर नोंद होणार असल्याने नंतर नोंदींमध्ये होणारी तफावत काही प्रमाणात कमी होऊन भ्रष्टाचारावर थोडे फार नियंत्रण मिळवता येणार आहे.