पो.नि. विकास देवरे यांनी गुन्हे दाखल न करता दाखवली योग्य वाट…
अमळनेर:- पोलीस स्टेशनला दोन गटाच्या तक्रारी आल्या म्हणजे गुन्हे दाखल करा आणि दोघांवर कारवाई करा अशी भूमिका साधारणपणे पोलीस अधिकाऱ्यांची असते. मात्र तालुक्यातील म्हसले येथील शेतकऱ्यांच्या दोन गटात सामंजस्य घडवून दोघांना न्याय मागण्याची दिशा दाखवून पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी पोलिसातील माणुसकीचे दर्शन घडवले.
तालुक्यातील म्हसले येथील चुलत भावांचे शेतीवरून वाद उद्भवले. यापूर्वी एक गुन्हा दाखल झाला होता. १८ रोजी दोन गटातील २० ते २५ जण पोलीस स्टेशनला आले. इनामी जमिनीचा वाद होता. तीन चार भाऊ ती जमीन करत होते आणि प्रत्यक्षात ती जमीन एका चुलत भावाच्या वडिलांच्या नावावर होती. वडिलांकडून मुलाने ती जमीन वाटणीने घेतली होती. माझ्या नावावर जमीन असल्याने मीच घेईल असे एकाचे म्हणणे होते तर तिघे चौघे म्हणत होते की, आम्ही अनेक वर्षांपासून जमीन करत आहोत जमीन आमच्या ताब्यात राहील असे म्हणत होते. इनामी जमिनीच्या कायद्याबाबत देखील उहापोह करण्यात आला. याबाबत पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी दोन्ही गटातील शेतकऱ्यांना एकत्र सभागृहात बसवले. एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल कराल,भानगडी कराल तर तुमचे दोघांचे नुकसान होईल. म्हणून दोघांना समजूत घातली. उपलब्ध असलेल्या कागदपत्रांच्या आधारे जमिनीचा ताबा न्यायालयातून घ्यावा तोपर्यंत आधी ज्यांच्याकडे शेतीचा ताबा असेल त्याच्याकडे राहू द्यावा. मात्र न्यायालयाने निर्णय दिल्यास अथवा स्थगिती दिल्यास त्याची अंमलबजावणी केली जाईल त्यावेळी कोणाचीही हयगय केली जाणार नाही. अशा कडक शब्दात इशारा देण्यासही ते मागे सरले नाहीत. मात्र विनाकारण दोघांच्या विरोधात गुन्हे दाखल होण्यापेक्षा दोघांनाही गोड शब्दात समजाऊन दोन्ही गटालाही ते पटल्याने त्यांनी विकास देवरे यांच्या निर्णयाचे कौतुक केले. या कामात हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव, संदेश पाटील यांनीही सहकार्य केले.