रात्री उशिरापर्यंत पंप लावून काढले पाणी, व्यावसायिकांचे 10 ते 12 लाखांचे नुकसान…
अमळनेर:- दि 18 रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसात भागवत रोडवरील रसमंजू कॉम्प्लेक्स मधील भिंत अचानक पडल्याने संपुर्ण कॉम्प्लेक्समध्ये पाणी शिरून यात बेसमेंट मधील व्यावसायिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले.
नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने सेवा देत रात्री साडे तीन वाजेपर्यंत पंप लावून पाणी काढल्याने पाण्याची पातळी कमी झाली,मात्र या घटनेत 4 ते 5 व्यवसायिकांचे सुमारे 10 ते 12 लाखांचे नुकसान झाले आहे.शहरात रात्री 8 वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाल्यानंतर रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात साचलेल्या पावसाचा तुंबलेल्या गटारीमुळे निचरा न झाल्याने हे पाणी रसमंजू कॉम्प्लेक्सच्या भिंतीमध्ये मुरून काही क्षणात ही भली मोठी भिंत पूर्णपणे कोसळली आणि क्षणात सारे पाणी या कॉम्प्लेक्स च्या बेसमेंट मध्ये शिरून संपूर्ण पुरुष बुडेल एवढे पाणी यात साचले,पावसामुळे बरेच व्यावसायिक दुकान बंद करून घरी गेले होते,घटनेची माहिती मिळताच त्यांनी धाव घेतली.आणि शक्य होईल तेवढा दुकानातील माल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र पाणी प्रचंड असल्याने पाण्याचा उपसा केल्याशिवाय पर्याय नव्हता अखेर पालिका कर्मचारी प्रसाद शर्मा तेथे पोहोचल्यावर त्यांनी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना संपूर्ण माहिती दिल्यावर पालिकेचा पंप तेथे आणण्यात आला पहाटे साडेतीन पर्यंत उपसा करण्याचे काम सुरू होते.
व्यावसायिकांचे मोठे नुकसान…
सदर घटनेत पाटील ऍग्रो एजन्सी यांचे मोठे नुकसान झाले असून सिझन सुरू झाल्याने दुकानात असलेला मोठा खत व बियाणे साठा संपुर्ण जलमय होऊन सुमारे सहा ते सात लाखांचे त्यांचे नुकसान झाले आहे. तसेच न्यू योगेश्वर इलेक्ट्रिकल यांचेही इलेक्ट्रिक साहित्य खराब होऊन मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय गणेश मोबाईल, अक्षरा प्लायवुड, हिंगलाज कांस्य थाळी आदी व्यावसायिकांच्या दुकानात देखील पाणी घुसल्याने त्यांचेही नुकसान झाले आहे.